IND vs AUS Border-Gavaskar Trophy 2024-25: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ही 22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना 03 जानेवारी 2025 पासून खेळवला जाईल. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विविध वक्तव्य केले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सपासून दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनपर्यंत अनेक खेळाडूंनी या मालिकेपूर्वी टीम इंडियाला इशारा दिला.


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत (Border-Gavaskar Trophy 2024-25) ऑस्ट्रेलियापुढे भारताचे आव्हान अत्यंत कठीण असल्याचे नॅथन लायनने मान्य केले. त्याने पुढे म्हटले की, 'ही मालिका जिंकणे आमच्यासाठी दहा वर्षांपासूनचे अपूर्ण काम राहिले आहे. खूप मोठा कालावधी झाला असून हे चित्र बदलण्यासाठी आम्ही खूप आतुर आहोत. विशेष करून घरच्या मैदानावर खेळताना. मला चुकीचे समजू नका, पण भारत एक सुपरस्टार संघ आहे आणि त्यांचा सामना करणे खूप आव्हानात्मक आहे. पण, चित्र बदलण्यासाठी मी खूप भुकेला आहे आणि हा चषक पुन्हा मिळावण्यासाठी आम्ही सर्वस्व देऊ, असं नॅथन लायनने सांगितले.


पॅट कमिन्स काय म्हणाला?


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार खूपच उत्साहित दिसत आहे. पॅट कमिन्स म्हणाला की, ही अशी ट्रॉफी आहे, जी मी यापूर्वी कधीही जिंकलेली नाही. ही अशी ट्रॉफी आहे जी संघातील बहुतांश खेळाडूंनी जिंकलेली नाही, त्यामुळे आता त्याच पद्धतीने मैदानात उतरणार आहोत. 


नॅथन लायनही विजयासाठी उत्सुक-


ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनही भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी खूप उत्सुक आहे. लायन म्हणाला की, 10 वर्षांपासून हे काम अपूर्ण आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने शेवटची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2014-15 मध्ये जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाने चारही मालिका जिंकल्या आहेत.


पॅट कमिन्सने घेतली विश्रांती-


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टॉम कमिन्सने बॉर्डर-गावस्कर स्पर्धेपूर्वी सुमारे 8 आठवड्यांचा दीर्घ ब्रेक घेतला आहे. कमिन्सने स्वत: त्याच्या ब्रेकबद्दल सांगितले होते. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वीच्या काही मालिकांमध्ये कमिन्स ऑस्ट्रेलियाचा भाग असणार नाही. कमिन्स म्हणाला होता की तो 18 महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे त्याला आता ब्रेक घ्यायचा आहे.


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चे वेळापत्रक-


पहिली कसोटी – 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर – पर्थ 
दुसरी कसोटी – 06 डिसेंबर ते 10 डिसेंबर – ॲडलेड
तिसरी कसोटी – 14 डिसेंबर ते 18 डिसेंबर – ब्रिस्बेन
चौथी कसोटी – 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर – मेलबर्न
पाचवी कसोटी- 03 जानेवारी ते 07 जानेवारी- सिडनी


संबंधित बातमी:


एका षटकात 39 धावा ठोकल्या, गोलंदाजाला धू धू धुतला; टी-20 मध्ये नवीन विश्वविक्रम, पाहा Video