Happy Birthday Parthiv Patel : यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने अत्यंत कमी वयात टीम इंडियामध्ये जागा मिळवली होती. जवळपास 17 वर्षाचा असताना इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट 2002 मध्ये त्याने टेस्ट मॅच खेळली होती. त्यानंतरही त्याने काही दमदार सामने खेळले. पण तो पूर्णपणे स्वत:ला सिद्ध करु शकला नाही. कारण पार्थिवच्या पाठोपाठच संघात महेंद्र सिंह धोनीची एन्ट्री झाली आणि सर्व फॉर्मेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून धोनीने जागा घेतली. ज्यानंतर पार्थिव आपोआपच संघाबाहेर गेला. तर याच पार्थिवचा आज (9 मार्च) वाढदिवस आहे.


पार्थिवचा जन्म गुजरातच्या अहमदाबादमध्ये 9 मार्च, 1985 रोजी झाला आहे. पार्थिवच्या कारकिर्दीचा विचार करता तो भारताकडून अंडर 16 आणि अंडर 19 संघातून खेळला आहे. त्याने पहिला आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट, 2002 मध्ये खेळला होता. पण या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर काही सामन्यात त्यानं उत्तम खेळी केली. पण एकाही सामन्यात तो कधीच शतक ठोकू शकला नाही. पार्थिवचा टेस्टमधील सर्वाधिक स्कोर 71 असून वनडेमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 95 आहे. त्यानंतर बराच काळ पार्थिवला धोनीच्या गैरहजेरीत संघात स्थान मिळत होतं. 


26 वेगवेगळ्या संघातून केली खेळी


विशेष गोष्ट म्हणजे पार्थिव पटेलने एकूण 26 वेगवेगळ्या संघासाठी सामने खेळले होते. तो भारतीय संघासह अनेक स्थानिक संघातू सामने खेळला आहे. आयपीएलचा विचार करता तो चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि डेक्कन चार्जेस अशा संघातून खेळला आहे. तसंच तो इंडिया बी, इंडिया रेड आणि इंडिया ग्रीन अशा संघासाठीही खेळला आहे. संपूर्ण कारकिर्दीत पार्थिवने 25 कसोटी सामन्यात 934 रन केले आहेत. ज्यात त्याने 6 अर्थशतकं झळकावली आहेत. तसंच 38 वनडे सामन्यात त्याने  4 अर्धशतकं ठोकत 736 रन केले आहेत. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha