मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने मोहाली कसोटीत अशी कमाल केली की आता तो जगातील अव्वल क्रमांकाचा कसोटी अष्टपैलू ठरला आहे. आयसीसीने आज (9 मार्च) कसोटी आकडेवारी जारी केली, यात रवींद्र जाडेजा अव्वल स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जाडेजाची रेटिंग 406 पॉईंट झाली आहे.


श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजाने पहिल्या डावात नाबाद 175 धावांची खेळी रचली होती. याशिवाय त्याने सामन्यात 9 विकेट्स देखील घेतल्या होता. या सामन्याआधी रवींद्र जाडेजा क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. मोहालीमधील शानदार खेळीनंतर रवींद्र जाडे हा सध्याचा सर्वोत्तम अष्टपैलू ठरला आहे असून त्याचा परिणाम क्रमवारीतही दिसत आहे.






रवींद्र जाडेजा याआधीही अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. 2017 मध्ये रवींद्र जाडेजाने पहिल्यांदा क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. त्यावेळी त्याचे 438 अंक होते. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत मोठ्या काळानंतर भारतीय खेळाडू पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत कसोटी गोलंदाज आणि फलंदाजांच्या यादीतच भारतीय खेळाडू बाजी मारत होते. 


आर अश्विनची घसरण
आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार, कसोटी क्रमवारी रवींद्र जाडेजासह आर अश्विन टॉप 3मध्ये आहे. आर अश्विनची घसरण झाली आहे. मोहाली कसोटीआधी तो दुसऱ्या स्थानावर होता. टॉप 3 मध्ये रवींद्र जाडेजा पहिल्या, जेसन होल्डर दुसऱ्या आणि आर अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे.


विराट कोहलीच्या रँकिंगमध्ये सुधारणा
माजी कर्णधार विराट कोहलीने नुकताच त्याच्या कारकीर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळला. मोहाली कसोटीत 45 धावा करणाऱ्या विराटची कसोटी क्रमवारी सुधारली आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांनी झेप घेत तो आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सहाव्या क्रमांकावर टीम इंडियाचा नवा कर्णधार रोहित शर्मा आहे. टॉप 10 मध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. दहाव्या क्रमांकावर रिषभ पंत आहे.


टॉप 10 मध्ये भारताच्या दोन गोलंदाजांचा समावेश 
गोलंदाजांची क्रमवारी पाहिली तर भारताचे दोन गोलंदाज टॉप 10 मध्ये आहेत. यामध्ये आर अश्विन दुसऱ्या आणि जसप्रीत बुमरा दहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे.