ENG vs IND: तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिल्यानंतर इंग्लंडचा संघ भारताशी एकमात्र कसोटी (ENG vs IND) सामना खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय. सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करत आहे. परंतु, बर्घिंगहॅम कसोटीपूर्वी रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं तो संघात परतणार की नाही? तसेच त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? याबाबत अद्याप बीसीसीआयनं कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, अखेरच्या सामन्यात इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीवर पराभूत करून भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय. महत्वाचं म्हणजे, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना पुढे ढकलण्यात आला होता. या सामन्यात भारताला पराभूत करून मालिका बरोबरीत आणण्यासाठी इग्लंडचा संघाचा मास्टर प्लॅन काय असेल? यावर इग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं भाष्य केलंय.
बेन स्टोक्स काय म्हणाला?
सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. लिसेस्टशायरविरुद्ध सराव सामना अनिर्णित ठरल्यानंतर भारतीय संघ इग्लंडशी पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. येत्या 1 जुलै- 5 जुलैदरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. यापूर्वी बेन स्टोक्स त्यांच्या मास्टर प्लॅनबाबत बोलला आहे. "भारत हा वेगळा विरोधक संघ आहे, आम्हाला मालिका ड्रॉ करायची आहे. आम्ही न्यूझीलंडविरुद्ध ज्या मानसिकतेनं खेळलो, त्याच मानसिकतेनं भारताविरुद्ध कसोटी सामन्यात मैदानात उतरू."
न्यूझीलंडविरुद्ध यशाचं श्रेय कोणाला?
"जगातील सर्वोत्कृष्ट संघावर 3-0 ने मालिका जिंकणे ही एक विशेष सुरुवात आहे. जेव्हा मी इंग्लंडच्या संघाचं कर्णधारपद स्वीकारलं तेव्हा मला कसोटी क्रिकेटबद्दल लोकांची मानसिकता बदलायची होती. न्यूझीलंडविरुद्ध विजयाचं सर्व श्रेय इंग्लंडचे प्रशिक्षक आणि बॅकरूम स्टाफकडं जातं", असंही बेन स्टोक्सनं म्हटलंय.
इंग्लंडची इतिहासिक कामगिरी
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडच्या संघाला 3-0 नं पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघानं लक्ष्याचा पाठलाग करताना सामने जिंकून इतिहास रचला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये इंग्लंडनं 250 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे पार केलं. ज्यामुळं जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरलाय. 145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडपूर्वी कोणत्याही संघानं मालिकेत तीन वेळा असा पराक्रम केला नव्हता.
हे देखील वाचा-
- ENG vs NZ: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडला नमवून इंग्लंड बनला 'चेज मास्टर'!
- Deepak Punia wins bronze medal: दीपक पुनियानं किर्गिझस्तानमध्ये तिरंगा फडकावला, सत्यबेल्डीला हरवून कांस्यपदक जिंकलं
- NZ vs IND: टी-20 विश्वचषकानंतर भारत न्यूझीलंडचा दौरा करणार; कधी, कुठे रंगणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक