Indian Cricket Team Coach : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.  2021 च्या T20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रीच्या जागी राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. राहुल द्रविडचा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ  विश्वचषकानंतर संपणार आहे. राहुल द्रविडसोबतचा करार वाढण्यात येणार का? राहुल द्रविड आपला कार्यकाळ वाढवणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण विश्वचषक फायनल हा राहुल द्रविडसाठी प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना ठरू शकतो, असे मानले जात आहे. विश्वचषकानंतर राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहणार नाही. 


विश्वचषकानंतर राहुल द्रविड थांबणार...


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत बीसीसीआयचे राहुल द्रविडसोबत कोणत्याही नवीन कराराबद्दल बोलणं झालेले नाही.  राहुल द्रविड आणि इतर सपोर्ट स्टाफबाबत बीसीसीआयमध्ये वेगवेगळी मतं असल्याचं बोललं जात आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा  राहुल द्रविडच्या कोचिंग शैलीवर सुरुवातीला आक्षेप होता, पण आता भारतीय संघाच्या अलीकडच्या कामगिरीनंतर हा दृष्टिकोन बदलला आहे. दरम्यान, राहुल द्रविडच्या कार्यकाळावर सस्पेंस असल्याचेही बोलले जात आहे. पण फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्या कराराची मुदत वाढवली जाऊ शकते. 
 
आगामी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेसाठी लक्ष्मणकडे जबाबदारी -


विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. मायदेशात होणाऱ्या मालिकेदरम्यान राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याकडे जबाबदारी सोपवली जाऊ शकते. भारतात होणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना टी 20 सामना 23 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ विशाखापट्टणममध्ये आमनेसामने येतील. या मालिकेत राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. मात्र, राहुल द्रविडच्या कार्यकाळावर बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


दरम्यान, विश्वचषकानंतर राहुल द्रविड स्वत:च प्रशिक्षकपदापासून मुक्त होणार असल्याच्याही चर्चा आहेत. राहुल द्रविड आपल्या करिअरचा शेवट गोड करण्यासाठी विश्वचषकानंतर प्रशिक्षकपदाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदामध्ये भारतीय संघाने विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील नऊ पैकी नऊ सामन्यात सहज विजय मिळवला होता. त्याशिवाय उपांत्य फेरीच्या सामन्यातही न्यूझीलंडचा पराभव करत फायनलचे तिकिट मिळवले आहे. 19 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया विश्वचषक विजयासाठी अहमदाबादच्या मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आहे.