BCCI Shift SMAT 2025 Knockout Matches to Pune : देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोच्या आतापर्यंत 1000 हून अधिक फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळं देशभरातील विविध विमानतळांवर प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. देशभरातील प्रत्येक विमानतळांवर प्रवाशांचा संताप पाहायला मिळत आहे. या संकटाच्या लाटेत आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील सापडले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे नॉकआउट सामने इंदूरमध्ये खेळवले जाणार होते. मात्र इंडिगो फ्लाइट संकट आणि प्रवासाच्या अडचणींमुळे बीसीसीआयला संपूर्ण वेन्यू बदलण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. होळकर क्रिकेट स्टेडियम आणि एमराल्ड हायस्कूल मैदान येथे होणारे हे सामने आता पूर्णपणे पुण्यात हलवण्यात आले आहेत.

Continues below advertisement

इंदूरहून पुण्यात हलवले गेले सर्व नॉकआउट सामने...

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे शेवटचे 12 सामने, सुपर लीग आणि अंतिम सामना 12 ते 18 डिसेंबरदरम्यान इंदूरमध्ये होणार होता. पण इंडिगो उड्डाण सेवेत बिघाड झाल्याने प्रवास व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे (MPCA) सीईओ रोहित पंडित यांनी ही स्थिती बीसीसीआयला आधीच कळवली होती. त्यानंतर बीसीसीआयने सर्व नॉकआउट सामने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेतला.

Continues below advertisement

आता पुण्यातील दोन मैदानांवर सामने

पुण्यातील एमसीए स्टेडियम आणि डीवाय पाटील अकादमी येथे SMAT चे नॉकआउट सामने आयोजित केले जाणार आहेत. या बदलामुळे संघांना, सपोर्ट स्टाफला आणि अधिकाऱ्यांना नव्या प्रवास योजनेची आखणी करावी लागणार आहे. पण, वेन्यूची उपलब्धता आणि प्रवासात कमी अडथळे यांचा विचार करता पुणे सर्वात योग्य पर्याय मानण्यात आला.

बीसीसीआयसाठी मोठी परीक्षा

वेन्यू बदलल्यानंतर बीसीसीआयसमोर अनेक लॉजिस्टिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. अहमदाबाद, कोलकाता, लखनऊ आणि हैदराबाद अशा चार ग्रुप-स्टेज शहरांतून खेळाडू, प्रशिक्षक, अंपायर आणि अधिकारी यांना पुण्यात आणावे लागणार आहे. त्यातच देशात इतरही घरगुती स्पर्धा सुरू आहेत. अहमदाबादमध्ये महिला अंडर-23 टी-20 ट्रॉफी आणि पुरुष अंडर-19 कूच बिहार ट्रॉफी. या स्पर्धांसाठी टीम्स आणि अधिकाऱ्यांचे सतत प्रवास आवश्यक आहे. जर इंडिगोचे संकट तसेच राहिले, तर आठ संघांसोबतच अंपायर आणि अधिकाऱ्यांना वेळेत पुण्यात पोहोचवणे बीसीसीआयसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

संकटातून मार्ग काढण्याची कसरत

आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांपैकी एक असलेले बीसीसीआय हे प्रवास संकट कसे हाताळते. अतिशय कमी वेळात सुरक्षित, सुलभ आणि नियोजित पद्धतीने सर्व टीम्सना पुण्यात हलवणे हे बोर्डासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. येणारे काही दिवस भारतीय घरगुती क्रिकेटसाठी सर्वात मोठी परीक्षा असू शकतात.

हे ही वाचा -

IND vs SA 3rd ODI : अखेर टीम इंडियाने नाणेफेक जिंकली! KL राहुलचा मोठा निर्णय, संघात केला बदल, जाणून घ्या Playing XI