India vs South Africa 3rd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज विशाखापट्टणममधील एसीए-वीडीसीए स्टेडियममध्ये रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. त्याआधी टीम इंडियाचा आयोजित सराव सत्र घेण्यात आला, ज्यामध्ये फक्त चार खेळाडूंनी सहभाग घेतला. विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी या सत्रात भाग घेतला नाही.

Continues below advertisement

गौतम गंभीरचा फक्त चार खेळाडूंना घेऊन सराव

आयोजित सरावात सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश होता. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफही या सत्राला उपस्थित होते. प्रत्यक्षात तिसऱ्या वनडेपूर्वी कोणताही औपचारिक सराव ठरवलेला नव्हता आणि हा पर्यायी सेशन होता. त्यामुळे चार खेळाडूंव्यतिरिक्त विराट-रोहितसह इतर सर्वांनी विश्रांती घेणे पसंत केलं.

Continues below advertisement

जैस्वाल आणि सुंदरसाठी निर्णायक सामना

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा वनडे विशेषतः यशस्वी जैस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदरसाठी खूप महत्त्वाचा आहे. शुभमन गिल अनुपस्थित असल्याने जैस्वालने मागील दोन्ही सामन्यांत रोहितसोबत सलामीची जबाबदारी निभावली, परंतु दोन डावांतून त्याच्या खात्यावर फक्त 40 धावा जमा आहेत. वनडे टीममध्ये स्थान मजबूत करण्यासाठी तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदरला रांचीमध्ये केएल राहुलच्या वरच्या क्रमांकावर, म्हणजे पाचव्या स्थानी फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. परंतु तो फक्त 13 धावा करून बाद झाला. दुसऱ्या सामन्यात तर फक्त एका धावेवर रनआउट झाला. गोलंदाजीतही त्याला एकही विकेट मिळालेली नाही. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा सामना त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर या मालिकेत खेळत नाही. त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली होती. पहिल्या सामन्यात तो पटकन बाद झाला, पण दुसऱ्या सामन्यात त्याने 105 धावांची शतकी खेळी करून संधीचे सोनं केलं.

भारताचा संभाव्य संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा 

दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ  : एडन मारक्रम, क्विंटन डिकॉक, टेम्बा बावुमा, मॅथ्यू ब्रीत्सके, रेयान रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, ऑटनील बार्टमॅन

भारत मालिका जिंकणार? 

दक्षिण आफ्रिकेनं भारताला वनडे मालिकेपूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत 2-0 असं पराभूत केलं होतं. भारतीय संघ वनडे मालिकेत परतफेड करेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.  भारतीय चाहत्यांचा अपेक्षा आता तिसऱ्या वनडेतील विजयानं पूर्ण होतात का ते पाहावं लागेल. दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समान संधी आहे. 

हे ही वाचा -

IND vs SA :दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडेत विजय मिळवून देखील तिसऱ्या वनडेत दोघांना बाहेर ठेवणार? कारणं समोर