IND vs SA ODI Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका  यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 6 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. यापूर्वी येत्या 28 ऑक्टोबरपासून टी-20 मालिका खेळली जाणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं दक्षिण आफ्रिकाविरुद्धची टी-20 मालिका भारतीय संघासाठी महत्वाची असेल. तर, टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला संघ एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलंय. तसेच राखीव खेळाडूही मुख्य खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचं राहुल द्रविडनं म्हटलं होतं. यामुळं दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे. तर, संजू सॅमसनवर उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. 


भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी उद्या भारतीय संघाची घोषणा करणार आहे. माहितीनुसार, या मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करेल. तर, संजू सॅमसन उपकर्णधार असेल. इनसाइड स्पोर्टनं दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासह ज्या खेळाडूंची टी-20 विश्वचषकासाठी निवड झालीय ते सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार नाहीत. दरम्यान, भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' संघाच्या तिसऱ्या एकदिवसीय मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय संघाची घोषणा केली जाणार आहे. 


नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
दरम्यान, आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही एकदिवसीय मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदार यांनाही भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. तर, भारताचा वेगवान युवा गोलंदाज उमरान मलिकलाही खेळण्याची संधी मिळू शकते. शुभमन गिल, ईशान किशन, कुलदीप यादवची संघात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. 


लक्ष्मण संभाळणार प्रशिक्षकाची जबाबदारी
दरम्यान, भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. यापूर्वी आयर्लंड दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मणनं प्रशिक्षकाची जबाबदारी संभाळली होती.


हे देखील वाचा-