कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. बंगाल भाजप मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय चेहऱ्याच्या शोधात आहे. अशातच बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली भाजपमध्ये प्रवेश करण्याची अटकळ बांधली जात आहे.
ममता सरकारने बंगालच्या न्यू टाऊनमध्ये आयसीएससी बोर्डाच्या बारावीपर्यंतच्या शाळेसाठी सौरभ गांगुली यांना जमीन दिली होती. परंतु नुकतंच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि शाळेसाठी दिलेली दोन एकर जमीन परत केली. भाजपमध्ये जाणार असल्याने गांगुली यांनी हा निर्णय घेतल्याची अटकळ बांधली जात आहे. परंतु गांगुली मला राजकारणात रस नाही, असं सौरभ गांगुली यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे.
राजकीय संबंध
सौरभ गांगुली आणि ममता बॅनर्जी यांचे राजकीय संबंध उत्तम आहे. सौरभ गांगुली यांना क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष बनवण्यामागे ममता बॅनर्जी यांचा हातभार होता, असं म्हटलं जातं. इतकंच नाही बीसीसीआयचे अध्यक्ष बनल्यानंतर सौरभ गांगुली यांचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे संबंध चांगले झाले आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये सौरभ गांगुली यांना बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तेव्हापासूनच 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सौरभ गांगुली भाजपचं नेतृत्त्व करु शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शाह या दोघांवरही बीसीसीआयच्या संविधानाच्या अवमानाचा खटला सुरु आहे. झारखंड राज्य क्रिकेट संघ (जेएससीए) मध्ये स्वत: कायमस्वरुपी सदस्य आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ झारखंडमध्ये खजिनदार असल्याचा दावा करणाऱ्या नरेश मकानी यांनी दोघांविरोधात खटला दाखल केला आहे.