नवी दिल्ली : क्रिकेट बोर्ड ऑफ कंट्रोल इंडिया (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. पुन्हा एकदा बीसीसीआयने (BCCI) आपली श्रीमंती दाखवून दिली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने गेल्या पाच वर्षांमध्ये 27000 कोटीहून अधिक कमाई केली आहे. बंपर कमाईसोबतच बीसीसीआयने टॅक्सही मोठ्या प्रमाणात भरला आहे. आर्थिक वर्ष 2018 ते 2022 दरम्यान बीसीसीआयने 27,411 कोटी रुपयांची भरघोस कमाई केली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत या संदर्भात माहिती दिली आहे. 


बीसीसीआयच्या उत्पन्नाचं साधन काय?


अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत भारतीय क्रिकेट बोर्डाच्या उत्पन्नासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी बीसीसीआयच्या उत्पन्न आणि त्यांचं साधनही सांगितलं. पंकज चौधरी यांनी सांगितलं की, बीसीसीआयला हे उत्पन्न मीडिया हक्क (Media Rights), प्रायोजक (Sponsership) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महसूल शेअर्सच्या माध्यमातून मिळाले आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार अनिल देसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंकज चौधरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. 


बीसीसीआयच्या कमाईचे आकडे राज्यसभेत 


अनिल देसाई यांनी संसदेत प्रश्न विचारला होता की, बीसीसीआय ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत क्रीडा संघटना असल्याची केंद्र सरकारला जाणीव आहे का? याशिवाय बीसीसीआयचे गेल्या पाच वर्षांतील उत्पन्न, खर्च आणि कराची माहिती देण्याची विनंतीही त्यांनी सरकारला केली. या प्रश्नाच्या उत्तरात, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सभागृहात सांगितलं की, सरकार जागतिक स्तरावर क्रीडा संस्थांच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती ठेवत नाही, पण त्यांनी BCCI च्या उत्पन्नाची माहिती राज्यसभेत दिली आहे.


पाच वर्षात 4298 कोटी रुपये कर


बीसीसीआयनेही या पाच वर्षांत चांगला कर भरला असून त्याचा आकडा 4298 कोटी रुपये आहे. बीसीसीआयने या पाच वर्षांत 15,170 कोटी रुपये खर्च दाखवला आहे. बीसीसीआयने आर्थिक वर्ष 2018 मध्ये 2917 कोटी रुपयांचा महसूल दाखवला होता, जो आर्थिक वर्ष 2022 मध्ये 7606 कोटी रुपयांवर गेला. आयपीएल आणि भारतीय क्रिकेटच्या मीडिया हक्कांच्या किमतीत वाढ हे त्यामागचे मुख्य कारण आहे.


2024 मध्ये वाढेल बीसीसीआयची कमाई


BCCI ची कमाई चालू आर्थिक वर्ष 2024 मध्ये आणखी वाढणार आहे. कारण बीसीसीआयने Disney Star आणि Viacom 18 सोबत पाच वर्षांसाठी 48,390 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यासोबत बीसीसीआयने Adidas आणि Dream11 सारखे नवीन प्रायोजक (Sponsers) देखील आहेत. पाच वर्षांसाठी आयपीएल मीडिया हक्कांव्यतिरिक्त, काही इतर करारही बीसीसीआयने केले आहेत.