BCCI Meeting Rohit Sharma Gautam Gambhir : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले. या तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला एकही सामना जिंकता आला नाही. यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कृतीत उतरल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने टीम इंडियाच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. सचिव जय शाह, रॉजर बिन्नी यांच्यासह प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा बीसीसीआयच्या या बैठकीला उपस्थित होते.
या विषयांवर झाली चर्चा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बैठक मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात झाली. ज्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धचा पराभव आणि आगामी बॉर्डर गावसकर ट्रॉफीबद्दल सखोल चर्चा झाली. बीसीसीआयची ही बैठक सुमारे 6 तास चालली. मात्र, या बैठकीची फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, निवड समितीमध्ये काही प्रमाणात असंतोष असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषत: गेल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले होते त्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासोबत या खेळपट्ट्यांवर भारताची कामगिरी चांगली नसतानाही 'रँक टर्नर' निवडणे हे काही मुद्दे चर्चेत आहेत.
जसप्रीत बुमराहला मुंबई कसोटीतून बाहेर ठेवण्याबाबत निवडकर्त्यांना माहिती देण्यात आली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बुमराहला मुंबई कसोटीतून बाहेर ठेवण्याचे संकेत दिले होते. यानंतर, बीसीसीआयकडून बुमराहच्या बाहेर राहण्याबाबत माहिती देण्यात आली की, त्याला व्हायरल फिव्हर आहे, ज्यातून तो पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. त्यानंतर बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली, जो वानखेडेमध्ये एकही विकेट घेऊ शकला नाही.
आता ऑस्ट्रेलियात कांगारू संघाचा पराभव करण्याचे कडवे आव्हान टीम इंडियासमोर असेल. बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धेत उभय संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
हे ही वाचा -