मुंबई : सध्या इंडियन प्रिमियम लिग म्हणजेच आयपीएलचे (IPL) सामने चालू आहेत. या सामन्यांत फलंदाज मैदानात धावांचा पाऊस पाडताना दिसतायत. जु्न्या, अनुभवी खेळाडूंपासून ते नव्या आणि तरुण खेळाडूंपर्यंत प्रत्येक खेळाडू आपापल्या टीमसाठी पूर्ण ताकदीने लढताना दिसतोय. दरम्यान, संपूर्ण भारत आयपीएलचे सामने पाहण्यात दंग असताना दुसरीकडे बीसीसीआयने आगामी टी-२० विश्वचषकासाठी (T-20 World Cup) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात अनेक तरुण चेहऱ्यांचा समावेश असून यात शिवम दुबे (Shivam Dube) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांचादेखील समावेश आहे. 


अखेर संधी मिळाली 


गेल्या अनेक वर्षांपासून संजू सॅमसन आणि शिवम दुबे हे भारतीय संघाचा भाग म्हणून खेळायला मिळण्याची संधी शोधत होते. संजू सॅमसन हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या संघाचा कर्णधार आहे. तर शिवम दुबे हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आघाडाची फलंदाज आहे. संघ कठीण परिस्थितीत असताना दुबेने अनेकवेळा संपूर्ण टीमला एकहाती विजय मिळवून दिलेला आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसन हादेखील कर्णधार म्हणून राजस्थान रॉयल्स या संघाला हिमतीने पुढे घेऊन जाताना दिसतो. हे दोन्ही खेळाडू भारतीय संघात आमचा समावेश कधी होतो, याची वाट पाहात होते. शेवटी या दोघांचाही टीम इंडियात समावेश झाला आहे. रोहित शर्मा कर्णधार असलेल्या या टीमध्ये दोघेही भारताला विजय मिळवून देण्यासाठी नेटने लढणार आहेत. 


शिवम दुबेची कारकीर्द काय? (Shivam Dube Cricket Career)


शिवम दुबे हा तीस वर्षांचा आहे. त्याने 15 डिसेंबर 2019 रोजी वेस्ट इंडिज विरोधात खेळताना एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. एवढा एकच सामना तो एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाचा भाग होता. टी-20 प्रकारात 3 नोव्हेंबर 2019 रोजी तो टीम इंडियाचा भाग म्हणून पहिल्यांदा बांगलादेश संघाविरोधात खेळला होता. या सामन्यात त्याला फक्त एकच धाव करता आली होती. टीम इंडियाचा भाग म्हणून तो शेवटचा टी-20 सामना 17 जानेवारी 2024 रोजी खेळलेला आहे. या सामन्यातही तो एकच धाव करू शकला होता. 


संजू सॅमसनची कारकीर्द (Sanju Samson Career)


संजू सॅमसन भारतीय संघाचा भाग म्हणून पहिला एकदिवसीय सामना 23 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरोधात खेळला होता. शेवटचा एकदीवसीय सामना त्याने 21 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळला होता. या दोन्ही सामन्यांत त्याने अनुक्रमे 46 आणि 108 धावा केल्या होत्या. संजू सॅमसन आपला पहिला टी-20 सामना 19 जानेवारी 2015 रोजी झिम्बाव्वेविरोधात खेळला होता. सॅमसन टीम इंडियाचा भाग म्हणून शेवटचा टी-20 सामना 17 जुलै 2024 रोजी खेळला होता. यातील पहिल्या सामन्यात त्याने 19 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात त्याला खातंदेखील खोलता आलं नव्हतं. 






संधीचं सोनं करणार का?


दरम्यान, टीम इंडियात समावेश व्हावा म्हणून कठोर मेहनत घेणारे संजू आणि शिवम यांना अखेर संधी मिळाली आहे. ते आता टी-20 विश्वचषकात भारतासाठी खेळणार आहेत. त्यामुळे त्यांना या संधीचं सोनं करता येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा :


हार्दिक पांड्या उपकर्णधार, शिवम दुबेला संधी, राहुलला झटका, विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड