Harbhajan Singh On Badlapur School Crime News: देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना कानावर येत असतानाच राज्यातील बदलापूर शहरात एक धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. बदलापूर पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेतील एक तीन वर्षांची आणि दुसऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकारानंतर स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. आज बदलापूर बंदाची हाक देण्यात आली असून अनेक नागरिकांनी शाळेच्या परिसरात जाऊन या घटनेचा निषेध करत आहे. शाळेच्या परिसरात पालक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. 


बदलापूरमधील या घटनेवर (Badlapur School Crime) भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि खासदार हरभजन सिंगने संताप व्यक्त केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली. आम्हा लोकांची काय चूक आहे... मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की, त्यांनी अशा मानसिकतेच्या लोकांवर अतिशय कठोर कारवाई करावी, असे हरभजनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना टॅग करत म्हटलं आहे.


हरभजन सिंगचं ट्विट-




मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवलं-


बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केल्याने पालकवर्ग हादरला होता. या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. 


शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा-


शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुलींवर अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे. घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे. आरोपीविरोधात पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना आम्ही सहकार्य केले, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


संबंधित बातमी:


Badlapur School: “ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल