Babar Azam's Grand Welcome In Pakistan : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने सुमार कामगिरी केली. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये स्थान मिळवता आले नाही. पाकिस्तान संघाने आठ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानले. नऊ साखळी सामन्यात पाकिस्तानला फक्त चार विजय मिळवता आले. कर्णधार बाबर आझम याला स्पर्धेत एकही मोठी खेळी करता आली नाही. त्याच्याकडून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, पण चाहत्याचा भंग झाला. नेतृत्वातही बाबर कमाल करु शकला नाही. त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर टीका झाली होती. पण आज विमानतळावर त्याचे ग्रँड वेलकम करण्यात आले. पाकिस्तानचा संघ आज कराची विमानतळावर लँड झाला.पाकिस्तानचा संघ आज दुबई मार्गे कराचीत पोहचला. त्यावेळी विमानतळावर ग्रँड वेलकम झाले. चाहत्यांनी बाबर आझमला गराडा घातला होता. पाकिस्तानच्या चाहत्यांनी किंग बाबर म्हणत घोषणाही दिल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 


बाबर आझम याचा कराची विमानतळावरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये विमानतळावर बाबर आझम याचे ग्रँड वेलकम केल्याचे दिसतेय. त्याशिवाय चाहत्यांची क्रेझही दिसत आहे. किंग बाबर... म्हणत चाहत्यांनी घोषणाबाजीही केली.  बाबर आझमची एक झलक पाहण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. त्याशिवाय सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ दिसत होती. बाबरच्या आजूबाजूला सर्वत्र सुरक्षा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, चाहते त्याच्या एका झलकसाठी उभे असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 



पाहा व्हिडीओ 





 






बाबरची विश्वचषकातील कामगिरी -  


2023 विश्वचषकात पाकिस्तान आणि बाबर आझम यांना मोठी कामगिरी करता आली नाही. बाबर आझम याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाही. बाबर आझम याने विश्वचषकात चार अर्धशतके ठोकली. पण त्यामधील तीन सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला. बाबरच्या फक्त एका अर्धशतकामुळे पाकिस्तानचा विजय झालाय. विश्वचषकातील नऊ साखळी सामन्यात बाबर आझम याने चार अर्धशतकाच्या मदतीने 320 धावा केल्या. त्यामध्ये 74 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होय.  साखळी सामन्यातील नेदरलँड्सविरोधात बाबरला फक्त पाच धावा करता आल्या. श्रीलंकेविरोधात 10, भारताविरोधात 50, ऑस्ट्रेलियाविरोधात 18, अफगाणिस्तानविरोधात 74, दक्षिण आफ्रिकाविरोधात 50, बांगलादेशविरोधात 09, न्यूझीलंडविरोधात नाबाद 66 आणि इंग्लंडविरोधात 38 धावांची खेळी केली.