World Cup 2023 Best 11 : विश्वचषक अखेरच्या टप्प्यात पोहचलाय.   45 साखळी सामन्यानंतर उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित झालेत. भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी उपांत्य फेरीचे तिकिट निश्चित केलेय. साखळी सामन्याच्या आधारावर वर्ल्डकपची बेस्ट प्लेईंग 11 निवडण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळाले नाही. रोहित शर्मासह चार भारतीयांनी स्थान निश्चित केलेय.  


बाबर आजम, मोहम्मद रिजवान, स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर, जोस बटलर, बेन स्टोक्स आणि मिचेल स्टार्क यासारख्या दिग्गजांना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळवता आले नाही. रचिन रविंद्र सारख्या युवा खेळाडूने मात्र आपले स्थान पक्के केलेय. पाहूयात प्लेईंग 11 मध्ये कोण कोणते खेळाडू आहेत.  


रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक करणार सलामी -


विश्वचषकात क्विंटन डिकॉक याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. विकेटकीपर फलंदाज डि कॉकने आथापर्यंत 9 सामन्यात  65.67 च्या सरासरीने 591 धावा चोपल्या आहेत. सलामीसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय दुसरा सलामी फलंदाज म्हणून रोहित शर्माचे नाव आहे. रोहित शर्माने विश्वचषकात 503 धावा चोपल्या आहेत. रोहितची स्पर्धा डेविड वॉर्नर याच्यासोबत होती. वॉर्नरच्या धावा जास्त आहेत, पण रोहितचा इम्पॅक्ट जबराट आहे. त्यामुळे रोहित उजवा ठरला. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली याचे नाव आहे. विराट कोहली यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. त्याने दोन शतके आणि पाच अर्धशतकाच्या मदतीने 594 धावा चोपल्या आहेत. 



मिडिल ऑर्डरमध्ये कोण कोण ?


मध्यक्रमच्या फलंदाजांनीही संधी मिळताच मोठी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र याने सर्वांनाच प्रभावित केलेय. त्याने 565 धावा काढल्या आहेत. तर मॅक्सवेल याने 397 धावांचा पाऊस पाडला आहे.चौथ्या क्रमांकावर रचिन रविंद्र याची निवड करण्यात आली आहे. तर पाचव्या स्थानावर ग्लेन मॅक्सवेल याने कब्जा केलाय. मॅक्सवेल याने विश्वचषकात द्विशतकही ठोकलेय. त्याशिवाय सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. सहाव्या स्थानावर हेनरिक क्लासेन याची निवड करण्यात आली आहे. क्लासेन याने वादळी फलंदाजी करत सर्वांनाच प्रभावित केलेय.  


मार्को यान्सन याने गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल केली आहे. त्यामुळे सातव्या स्थानावर त्याची निवड करण्यात आली आहे. यानसन याने आतापर्यंत 17 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय फलंदाजीतही मोलाचे योगदान दिलेय. आठव्या स्थानावर रविंद्र जाडेजा याची वर्णी लागली आहे. जाडेजाने आतापर्यंत 16 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय तो तळाला चांगली फलंदाजी करतो. त्याने न्यूझीलंडविरोधात ती धमक दाखवली. 


गोलंदाजीत कोण कोण ?


अॅडम झम्पाकडे फिरकीची जबाबदारी असेल. त्याने विश्वचषकात आतापर्यंत 22 विकेट घेतल्या आहेत. झम्पाच्या मदतीला रचिन रविंद्र आणि ग्लेन मॅक्सवेल हे पर्यायही आहेत. त्याशिवाय रविंद्र जाडेजा आणि मार्को यान्सनही हे अष्टपैलू खेळाडूही आहेत. दोन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज भारताचेच आहेत. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी यांनी विश्वचषकात प्रभावी मारा केलाय. बुमराह याने आपल्या प्रभावी माऱ्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांनी जखडून ठेवले. शामीला सुरुवातीला संधी मिळाली नाही. पण त्याने संधी मिळाल्यानंतर विकेट्स घेण्यात कसर सोडली नाही. 12 वा खेळाडू म्हणून श्रीलंकेचा दिलशान मधुशंका याची निवड करण्यात आली आहे. 



ग्लेन मॅक्सवेल, रचिन रविंद्र, मार्को यान्सन आणि रविंद्र जाडेजा... असे चार अष्टपैलू खेळाडू आहेत. तर तीन डम झम्पा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी हे स्पेशालिस्ट गोलंदाज आहेत. म्हणजे.. गोलंदाजीचे सात पर्याय आहेत. तर आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे. त्यामुळे साखळी सामन्यातून तयार झालेला हा संघ संतुलित दिसतोय. या संघाची धुरा रोहित शर्मा याच्या खांद्यावर असेल. विकेटकिपरची धुरा क्विंटन डि कॉक संभाळेल.


2023 वर्ल्ड कपची बेस्ट इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), विराट कोहली, रचिन रवींद्र, ग्लेन मैक्सवेल, हेनरिक क्लासेन, मार्को यानसेन, रवींद्र जडेजा, अॅडम झम्पा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी