Shoey Celebration Origin : यूएईमध्ये झालेल्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियानं नाव कोरलं. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच चषक उंचावला. या विजयानंतर चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाने विजयी सेलिब्रेशन केलं. पण त्यांचं सेलिब्रेशन अनेकांना खूपलं. सोशल मीडियावर त्यावरुन टीकास्त्र अन् टीका, नाराजी व्यक्त करण्यात आली. विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बूटामधून दारु पिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी उंचावल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये गेले अन् सेलिब्रेशनला सुरुवात झाली. सामन्याचा हिरो मिशेल मार्शला ग्लेन मॅक्सवेलनं मिठी मारली. भावनिक झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या डोळ्यात अश्रूही येत आहे. या भावनिक क्षणानंतर ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन झालं. मॅथ्यू वेड, फिंच आणि मार्कस स्टॉयनिस यांनी बूटामधून बियर प्यायली. याचा व्हिडीओ आयसीसीनं आपल्या ट्वीटरवर पोस्टही केलाय. या व्हिडीओनंतर काही त्यांच्यावर टीकेची झोड उडाली. पण ऑस्ट्रेलियासाठी हे सेलिब्रेशन नवं नाही. गेल्या काही वर्षांपासून जेतेपदानंतर ऑस्ट्रेलियातील खेळाडू असेच सेलिब्रेशन करतात. फॉर्मुला वनपासून क्रिकेटपर्यंत सर्व खेळाडू अशा प्रकारचं सेलिब्रेशन करतात.
बूटामध्ये बियर टाकून सेलिब्रेशन करतात त्याला शूई (shoey) असं म्हटलं जातं. याची सुरुवात जर्मनीमध्ये 18 व्या शतकात झाली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियातही अशाच प्रकारच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. रियाल हॅरीस यानं V8 Utes स्पर्धेत सर्वात आधी शूई सेलिब्रेशन केलं होतं. त्यानंतर अशाच प्रकारचं सेलिब्रेशन V8 सुपरकार स्पर्धा जिंकल्यानंतर डेव्हिड रॅनल्ड्स यानं केलं. त्यानंतर 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात अशाप्रकराच्या सेलिब्रेशनची लाट आली. जॅक मिलर यानं केलेलं शूई सेलिब्रेशन चांगलेच चर्चेत राहिलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फॉर्म्युला वन रेसर (F1)डॅनियल रिकियार्डो यानं या सेलिब्रेशन केलं. त्यानं केलेलं हे फेमस सेलिब्रेशन नंतर ऑस्ट्रेलियात चांगलेच गाजलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू असं सेलिब्रेशन करताना अनेकदा दिसले.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचं सेलिब्रेशन :
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेटनं पराभव करत ऑस्ट्रेलियानं चषकावर नाव कोरलं आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियानं क्रिकेट जगतावरील आपला दबदबा कायम असल्याचं दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियाकडे सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे आयसीसीच्या 8 ट्रॉफी आहेत. ऑस्ट्रेलिया 1987, 1999, 2003, 2007, 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे चॅम्पियन झाले होते. 2006 आणि 2009 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता टी-20 मध्येही चषकावर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाकडे आयसीसीच्या सर्वाधिक 8 ट्रॉफी आहेत. त्यानंतर भारत आणि वेस्ट विडिंजकडे प्रत्येकी पाच-पाच ट्रॉफी आहेत.
टी-20 मध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच चॅम्पियन -
ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन झालाय. 2007 पासून टी 20 विश्वचषकाला सुरुवात झाली. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियानं टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. यावेळी ऑस्ट्रेलियानं कोणतीही चूक केली नाही.
टी – 20 विश्वचषकावर नाव कोरणारे संघ -
2007: भारत
2009: पाकिस्तान
2010: इंग्लंड
2012: वेस्ट विंडिज
2014: श्रीलंका
2016: वेस्ट विंडिज
2021 : ऑस्ट्रेलिया