Australia Win over South Africa : सध्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेतील पहिल कसोटी सामना जिंकल्यावर आता दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Australia vs South Africa) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे मागील 17 वर्षात पहिल्यांदाच असं घडले आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघाला स्वत:च्या भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. यापूर्वी 2005-06 मध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान म्हणून दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेत पराभव केला होता. ज्यानंतर दोन्ही संघामध्ये झालेल्या तीन कसोटी मालिकांमध्ये दक्षिण आफ्रिका संघानं विजय मिळवला.



दक्षिण आफ्रिकेची 17 वर्षांपासून विजयी घोडदौड


 याआधी म्हणजे 2005-06 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका 0-2 ने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने 2008-09 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. दक्षिण आफ्रिका संघाचा हा ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी मालिका विजय ठरला. त्यानंतर 2012-13 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळली. यावेळी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना दक्षिण आफ्रिकेच्या नावे झाला. अशाप्रकारे यावेळीही दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात 1-0 अशा फरकानं पराभूत केलं. त्यानंतर 2016-17 मध्ये, दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा एकदा तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात आला होता. यावेळीही त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करून कांगारूंच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकण्याची हॅट्ट्रिक पूर्ण केली.


यंदा दक्षिण आफ्रिकेची विजयी मालिका खंडीत


दक्षिण आफ्रिकेकडे मजबूत कसोटी संघ आहे. अशा स्थितीत यावेळीही ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावर पराभव होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 6 विकेट्सने आणि दुसरा सामना एक डाव 182 धावा अशा मोठ्या फरकाने जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत एकतर्फी विजयी आघाडी घेतली आहे. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिका संघाचा विजयी रथ यावेळी ऑस्ट्रेलियाला थांबवण्यात यश आलं आहे. 


हे देखील वाचा-