India vs Pakistan Test Match Melbourne : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी कायमच उत्सुक असतात. पण दोन्ही देशातील संबंध फारसे ठिक नसल्याने दोघेही एकमेंकाचा दौरा करत नाहीत. अशामध्ये केवळ मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये दोघेही आमने-सामने येतात. त्यामुळे कसोटी सामन्यात दोघांना आमने-सामने पाहण्याची क्रिकेटरप्रेमींची इच्छा गेली कित्येक वर्षे पूर्ण होत नाही.  पण आता क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना खेळवला जाऊ शकतो. T20 विश्वचषकादरम्यान झालेल्या सामन्यातील चुरस पाहून मेलबर्न क्रिकेट क्लबला (MCG) या दोन देशांमधील कसोटी सामन्याचे आयोजन करायचे आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) चे व्यवस्थापन करणाऱ्या मेलबर्न क्रिकेट क्लबने अलीकडेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) सोबत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामना आयोजित करण्याबाबत चर्चा केली.


पीटीआयमध्ये (PTI) प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, मेलबर्न क्रिकेट क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी ऑक्टोबरमध्ये येथे खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक सामन्यातील जबरदस्त यश पाहता भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना आयोजित करण्यात रस दाखवला आहे. या दोन देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात 90 हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. फॉक्सने सेन रेडिओला सांगितले की, “एमसीजीमध्ये सलग तीन कसोटी सामने खेळणे निश्चितच छान होईल. स्टेडियम प्रत्येक वेळी प्रेक्षकांनी खचाखच भरले जाईल.'' पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोललो आहोत. मला माहित आहे सरकारलाही हे मान्य असेल. पण व्यस्त वेळापत्रकात हे खूप कठीण आहे, म्हणून मला वाटते की हे एक मोठे आव्हान असणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (ICC) चर्चा करावी. क्रिकेट ऑस्ट्रेलिया याविषयी आयसीसीशी बोलणे सुरूच ठेवेल आणि त्यासाठी आग्रही राहील अशी अपेक्षा आहे.


2007 मध्ये अखेरची कसोटी


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिका शेवटची 2007 मध्ये खेळली गेली होती. यानंतर त्यांचा सामना फक्त आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धेत झाला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पुढील चक्रात पाकिस्तान 2023 मध्ये MCG येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळणार आहे. फॉक्सला आशा आहे की, तीन कसोटी सामन्यांच्या या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याप्रमाणे स्टेडियम खचाखच भरले जाईल. याबाबत बोलताना फॉक्स म्हणाला, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात जे वातावरण होते, असे वातावरण मी एमसीजीमध्ये यापूर्वी पाहिले नव्हते. प्रत्येक चेंडूनंतरचा आवाज अभूतपूर्व होता. लोकांनी आपल्या कुटुंबियांसह याचा पुरेपूर आनंद घेतला.''


हे देखील वाचा-