India vs New Zealand 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत मालिका जिंकली आहे. आता तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे. 


न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला (Harshit Rana) संधी मिळेल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर गेल्या अनेक दिवसांपासून हर्षित राणाच्या गोलंदाजीवर लक्ष ठेऊन आहे. तर फिरकीपटूमध्ये रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांपैकी एकालाच संधी मिळेल. वानखेडेची खेळपट्टीतून वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर तिसऱ्या कसोटी सामन्यात कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 






ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड-


बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाने हर्षित राणाचा 18 सदस्यीय संघात समावेश केला आहे. पुढील महिन्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. हर्षित राणा या मालिकेत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याला मुंबईत खेळण्याची संधी मिळू शकते. 


हर्षित राणा अन् गौतम गंभीरने केलंय एकत्र काम-


टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हर्षित राणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. हर्षित राणा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. हर्षित राणा आणि गौतम गंभीर यांनी कोलकाता नाईट रायडर्सकडून एकत्र काम केले आहे. हर्षित राणाचा देशांतर्गत सामन्यांमध्ये उत्कृष्ट विक्रम आहे. त्यामुळे आता तो टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करू शकतो.


हर्षित राणाची कारकीर्द-


हर्षित राणाने आतापर्यंत प्रथम श्रेणीत 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 43 विकेट घेतल्या आहेत. हर्षित राणाची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 45 धावांत 7 विकेट्स घेतल्या आहेत. हर्षित राणाने 14 लिस्ट ए मॅचमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत. हर्षित राणाने 25 टी-20 सामन्यात 28 विकेट्स घेतल्या आहेत. आता हर्षित राणा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.


संबंधित बातमी:


Ind vs Nz 3rd Test : गंभीर-रोहित 'या' खेळाडूवर खेळणार शेवटचा डाव; मुंबईत फेल ठरला तर कारकीर्दीला लागणार ब्रेक