IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये (India vs Australia) दमदार प्रदर्शन करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या गुणतालिकेत ऑस्ट्रिलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. डब्लूटीसीच्या दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 6 सामन्यात विजय मिळवला आहे. एवढेच नव्हे तर, आयसीसी कसोटी क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकाविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 10 विकेट्सनं जिंकल्यानंतर ऑस्ट्रिलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं (Pat Cummins) भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.  "कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारतात जाऊन कसोटी मालिका जिंकावी लागेल", असं त्यानं म्हटलंय.


पॅट कमिन्स काय म्हणाला?
श्रीलंकाविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत कमिन्स म्हणाला की, "ऑस्ट्रेलियाच्या संघाला पुढच्या वर्षी भारतात कसोटी मालिका खेळायची आहे. तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल आणि आम्ही ते केले. जगातील नंबर वन कसोटी संघ बनायचं असेल तर परदेशात जाऊन जिंकणं गरजेचं आहे. आमच्याकडे मार्नस लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन आणि अॅलेक्स कॅरी आहेत, ज्यांना या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव नाही. पहिल्या सामन्यात आमचा दृष्टिकोन खूप चांगला होता. सर्व फलंदाजांचाकडं एक वेगळा प्लॅन होता. प्रत्येकाची खेळण्याची पद्धत वेगळी असली, तरी गोलंदाजांवर दबाव निर्माण करणं हा त्यांचा उद्देश होता. हा अनुभव आगामी मालिकेत कामी येईल", असंही पॅट कमिन्सनं म्हटलंय.


ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
ऑस्ट्रेलियाचा संघ पुढच्या वर्षी फेब्रुवारी- मार्च महिन्यात भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताशी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दरम्यान, डब्लूटीसी 2021-23 च्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या दृष्टीनं भारतासाठी ही मालिका अतिशय महत्वाची आहे. ऑस्ट्रेलियानं 2004 साली भारतीय भूमीवर शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. 


हे देखील वाचा-