ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला हरवून सात सामन्यांमधल्या सहाव्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियानं सहा विजयांच्या बारा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. इंग्लंडची तिसऱ्या पराभवामुळं गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्थान राखायचं, तर इंग्लंडला अखेरच्या दोन सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंडसारख्या तगड्या प्रतिस्पर्धी संघांना हरवावं लागणार आहे.
ऑस्ट्रेलियानं या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 286 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ऑस्ट्रेलियाच्या प्रभावी आक्रमणासमोर इंग्लंडचा अख्खा डाव 221 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरनडॉर्फनं 44 धावांत पाच आणि मिचेल स्टार्कनं 43 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं 89 धावांची झुंजार खेळी केली.
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज अॅरॉन फिन्चनं यंदाच्या विश्वचषकातलं दुसरं शतक झळकावलं. त्याच्या या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत सात बाद 285 धावांची मजल मारली. त्यात फिन्चचा वाटा होता 116 चेंडूंत शंभर धावांचा. त्याचं हे आजवरच्या वन डे कारकीर्दीतलं पंधरावं शतक ठरलं. वॉर्नरच्या शतकाला अकरा चौकार आणि दोन षटकारांचा साज होता. फिन्चनं डेव्हिड वॉर्नरच्या साथीनं 123 धावांची सलामी दिली. वॉर्नरनं 61 चेंडूंत 53 धावांची खेळी उभारली.
संबंधित बातम्या
World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर 48 धावांनी दणदणीत विजय