IND W vs BAN W , Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी केली आहे. उपांत्य सामन्यात बांगलादेशचा पराभव करत भारताने पदक निश्चित केलेय. भारताच्या गोलंदाजंनी बांगलादेशला अवघ्या ५१ धावांत रोखले. हे आव्हान भारताने आठ विकेट आणि १२ षटके राखून सहज पार केले. 


बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. कर्णधार स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी धावांचा गती वाढवली. पण संघाची धावसंख्या १९ झाल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार स्मृती मंधाना सात धावांवर बाद झाली. त्यानंतर शेफाली वर्मा आणि जेमिमा यांनी भाराताचा डाव सावरला. दोघांनी भारताचा विजय दृष्टीक्षेपात आणला. पण त्याचवेळी शेफाली वर्मा १६ धावांवर तंबूत परतली. त्यानंतर जेमिमाने भारताला विजय मिळवून दिला. जेमिमान नाबाद २० धावांची खेळी केली. यामध्ये तीन चौकारांचा समावेश आहे.




नॉकआऊट सामन्यात बांगलादेशची कर्णधार नगर सुल्ताना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. बांगलादेशचा संपूर्ण संघ १७.५ षटकात अवघ्या ५१ धावांत तंबूत परतला. कर्णधार सुल्ताना वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. सुल्ताना हिने १२ धावांची खेळी केली. 


पूजा वस्त्राकर हिने बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर धक्का दिला. पूजाने पहिल्या षटकात बांगलादेशच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले. यातून बांगलादेशचा संघ सावरलाच नाही. बांगलादेशची सलामी जोडीला एकही धाव काढता आली नाही. दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. शोबाना हिने आठ धावांची खेळी केली.शोरना अख्तरला खातेही उघडता आले नाही. खातुन तीन, एन अख्तर नऊ धावांवर बाद झाली. 


भारताकडून पूजा वस्तारकर हिने विकेटचा चौकार मारला. पूजाने चार षटकात १७ धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. तितास साधू हिने चार षटकात दहा धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. अमनजीत कौर हिने तीन षटकात दहा धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. राजेश्वरी गायकवाड याने चार षटकात आठ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. देविका वैद्य हिने एक षटक निर्धाव टाकत एक विकेट घेतली. दिप्ती शर्माची विकेटची पाटी कोरीच राहिली.