Virat Kohli : कोलंबोमध्ये विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने कोलंबोत लागोपाठ चौथे शतक ठोकले आहे. कोलंबोमध्ये पावसाने बॅटिंग थांबवल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहलीने वादळी फलंदाजी करत शतक ठोकले. त्याशिवाय विराट कोहलीने वनडेमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीने आजच्या नाबाद 122 धावांच्या खेळीसह अनेक विक्रम नावावर केले आहेत.
विराट कोहली 13 हजारी मनसबदार!
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीने केला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. पाकिस्तानविरोधात 98 धावा करताच विराट कोहलीने 13 हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीने 267 व्या डावात 13 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 13 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी सचिन तेंडुलकर याला 321 डाव लागले होते. विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगाकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसुर्या यांनी वनडे क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.
विराट कोहलीचे 47 वे शतक
विराट कोहलीने याने वनडे क्रिकेटमधील 47 वे शतक ठोकले. विराट कोहली याने सर्वात वेगवान 47 शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. विराट कोहलीच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकर याने 452 डावात 49 शतके ठोकली आहेत. विराट कोहली पुढील काही दिवसात हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
कोलंबोत विराटचाच जलवा -
कोलंबोमध्ये विराट कोहली याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने आर. प्रेमदासा स्टेडिअमवर 110 च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने कोलंबोच्या मागील चार डावात शतके ठोकली आहेत. आजच्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 122 धावांची खेळी केली. त्याआधी झालेल्या तीन सामन्यात त्याने 128*, 131 आणि 111 धावा चोपल्या आहेत.
विराट कोहलीचे वनडे करिअर
विराट कोहलीने वनेडमध्ये आज 13 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीने 267 डावात 13024 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 47 शतके ठोकली आहेत. त्याशिवाय 65 अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट-केएलची द्विशतकी भागिदारी -
शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागिदारी करत पाया रचला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी 194 चेंडूमध्ये 233 धावांची भागिदारी केली. विराट कोहली याने 94 चेंडूमध्ये नाबाद 122 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये विराट कोहलीने 9 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तर केएल राहुल याने 106 चेंडूत 111 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार ठोकले.