लाहोर, पाकिस्तान : आशिया कप सुपर-4 फेरीतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेशमध्ये (Pakistan Vs Bangladesh) खेळवला जात आहे. या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय बांगलादेशने घेतला. मात्र, त्यांचा डाव 38.4 षटकांत 193 धावांवर आटोपला. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 194 धावांचे आव्हान आहे.
पाकिस्तानच्या लाहोर येथील गडाफी स्टेडियमध्ये आजचा सामना सुरू आहे. बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुश्फिकर रहीमने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 87 चेंडूंमध्ये 64 धावांची संयमी खेळी साकारली. यामध्ये त्याने 5 चौकार लगावले. त्याशिवाय, कर्णधार शाकिब अल हसन याने 57 चेंडूंमध्ये 53 धावा केल्या. या अर्धशतकी खेळीत त्याने सात चौकार लगावले.
पाकिस्तानच्या गोलंदाजांचा तिखट मारा
पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हरिस रौफने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय मोहम्मद नसीमने बांगलादेशच्या तीन खेळाडूंना बाद केले. शाहीन आफ्रिदी, फहीम अश्रफ आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली
मुश्फिकर रहीम आणि शकिब अल हसन यांच्याशिवाय बांगलादेशच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. बांगलादेशचे 5 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. बांगलादेशच्या 4 फलंदाजांनी 47 धावांपर्यंतची खेळी साकारून तंबूत परतले. मुश्फिकर रहीम आणि शकिब अल हसन यांच्यात पाचव्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी झाली. मात्र शकिब अल हसन बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव पत्त्यांच्या घरासारखा कोसळला. शाकिब अल हसननंतर मुश्फिकर रहीमनही तंबूत परतला. त्यानंतर बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात पाकिस्तानी गोलंदाजांना फारशी अडचण आली नाही.
सुपर-4 फेरीमध्ये एकूण सहा सामने रंगणार
सुपर-4 फेरीत एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर गुणतालिकेतील टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. सुपर-4 फेरीत 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. याआधी 2 सप्टेंबर रोजी दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ समोरासमोर आले होते, परंतु पावसामुळे तो सामना रद्द झाला होता. परिणामी दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला होता.
सुपर-4 फेरीतील सामन्यांचे वेळापत्रक
6 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश - लाहोर
9 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश - कोलंबो
10 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध भारत - कोलंबो
12 सप्टेंबर - भारत विरुद्ध श्रीलंका - कोलंबो
14 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका - कोलंबो
15 सप्टेंबर - भारत विरुद्ध बांगलादेश - कोलंबो
17 सप्टेंबर - अंतिम सामना - कोलंबो