Akash Deep Story India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने (England vs India, 2nd Test) तब्बल 336 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलची (Shubhman Gill) सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. शुभमन गिलने पहिल्या डावात 269 धावा आणि दुसऱ्या डावात 161 धावा केल्या. परंतु भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने (Akash Deep) देखील चमकदार कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आकाश दीपने पहिल्या डावात 4, तर दुसऱ्या डावत 6 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्यामुळे आकाश दीपचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता.
कोण आहे आकाश दीप? (Who is Akash Deep?)
आकाश दीप हा भारतीय क्रिकेटपटू असून वेगवान गोलंदाज आहे. आकाशदीपचा जन्म 15 डिसेंबर 1996 रोजी झाला असून तो मूळचा बिहारचा आहे. 28 वर्षीय आकाशदीपचे मुळ गाव सासाराम (रोहतास-बिहार) हे असून त्याला सासाराम एक्स्प्रेस म्हणून ओळखले जाते.
सहा महिन्यांत वडील अन् मोठा भाऊ गमावला-
आकाश दीपला क्रिकेट खेळण्यास त्याच्या वडीलांचा विरोध होता. वडिलांसोबत भांडत नोकरीच्या शोधात तो काकाच्या मदतीने पश्चिम बंगालमध्ये आला आणि स्थानिक क्रिकेट अकादमीत सहभागी झाला. आकाश दीप वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होऊ लागला, परंतु आकाशला सहा महिन्यांत त्याचे वडील आणि मोठा भाऊ गेल्याने कुटुंबावर दुःखाचा सामना करावा लागला. यामुळे त्याला तीन वर्षांसाठी खेळ सोडावा लागला. आकाशच्या घरात पैसे नव्हते. त्याला त्याच्या आईची काळजी घ्यावी लागली. यामुळे त्याने तीन वर्षे क्रिकेट सोडले. नंतर आकाशला वाटले की तो जास्त काळ क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. त्यानंतर तो दुर्गापूरला गेला. तिथून तो पुन्हा कोलकाताला गेला. आकाशने कधीच हार मानली नाही. कोलकातामध्ये आल्यानंतर त्याने CAB च्या दुसऱ्या विभागीय लीगमध्ये युनायटेड क्लबकडून सुरुवात केली.
आकाशच्या बहिणीची कर्करोगाशी झुंज-
आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या मॅचविनिंग कामगिरीनंतर एक धक्कादायक खुलासा केला. आकाशने म्हटले की, त्याच्या बहीणीला कर्करोग झाला आहे आणि ही कामगिरी तिला समर्पित आहे. यावेळी आकाश दीप भावूक झाल्याचे दिसले. माझी बहीण कर्करोगाने ग्रस्त आहे. मी जेव्हा जेव्हा चेंडू हातात घेत असे तेव्हा तिचे विचार माझ्या मनात येतात. मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही, परंतु दोन महिन्यांपूर्वी माझ्या बहिणीला कर्करोगाचे निदान झाले होते. ती माझ्या कामगिरीवर खूप आनंदी असायची आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य असायचे, असं आकाश दीपने सांगितले.
आकाश दीपची कारकीर्द-
आकाशने बंगालसाठी 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने 138 विकेट्स घेतल्या. 28 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 42 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 48 टी-20 सामन्यांमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत. आकाश आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळला आहे. या वर्षी तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमध्ये 10 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. आकाश खालच्या फळीत फलंदाजी करतो आणि मोठे फटके मारण्याचीही त्याच्यात क्षमता आहे.