(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ranji Trophy : पुजारा पुन्हा फ्लॉप, रहाणेला खातेही उघडता आले नाही
Ranji Trophy : खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर असणारे अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप झाले आहेत.
Ranji Trophy : खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर असणारे अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप झाले आहेत. भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सध्या रणजी स्पर्धेत आपलं नशीब अजमावत आहेत. मात्र, तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. गुरुवारी रणजी स्पर्धेतील एलीट ग्रुप डी च्या सामन्यात सौराष्ट्राकडून खेळणारा पुजारा अवघ्या सहा चेंडूनंतर तंबूत परतला. तर मुंबईकडून खेळणाऱ्या रहाणेला आपले खातेही उघडता आले नाही.
चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर चिराग जानी याचे नाबाद शतक आणि अन्य दोन फलंदाजांच्या अर्धशतकाच्या बळावर सौराष्ट्राने पहिल्या दिवसाखेर चार बाद 325 धावा चोपल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सौराष्ट्र संघाला सलामी फलंदाज हार्विक देसाई (38) आणि स्नेल पटेल (24) यांनी चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, त्यानंतर डाव कोसळला होता. चिरागने दमदार फलंदाजी करत नाबाद 125 धावांची खेळी केली आहे. या खेळीदरम्यान चिरागने 16 चौकार आणि चार षटकार लगावले. चिरागला शेल्डन जॅक्सन याने चांगली साथ दिली. शेल्डनने 112 चेंडूत 12 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 75 धावांची खेली केली. त्याशिवाय अर्पित वसावडा नाबाद 51 धावांवर खेळत आहे.
पुजारा पुन्हा फ्लॉप –
अनुभवी चेतेश्वर पुजाराला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात पुन्हा अपयश आले. खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या पुजारा सहा चेंडू खेळून बाद झाला. या खेळीदरम्यान, पुजाराने 8 धावांची खेळी केली. पुजाराला देबब्रत प्रधान याने बाद केले.
रहाणेला खातेही उघडता आले नाही –
खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून आपली जागा गमावणाऱ्या अजिंक्य रहाणेला रणजी चषकातही आपला फॉर्म गवसला नाही. गुरुवारी मुंबई आणि गोवा यांच्यात सामना झाला. या सामन्यात अजिंक्य रहाणे शून्य धावांवर बाद झाला. गोवा संघाने लक्ष्य गर्ग आणि अमित यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईला 163 धावांत गुंडाळले. लक्ष्य गर्गने 46 धावांच्या मोबदल्यात सहा बळी मिळवले तर अमितने 47 धावांच्या मोबदल्यात चार बळी मिळवले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा गोवा संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 114 धावा केल्या आहेत. मुंबईकडून सर्फराज खान याने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली.