Afghanistan vs Pakistan 1st ODI : आशिया चषक आणि विश्वचषकाआधी आफगाणिस्तानविरोधात पाकिस्तान संघाची टॉप ऑर्डर ढेपाळली आहे. कर्णधार बाबर आझम याला तर खातेही उघडता आले नाही. फखर जमान दोन धावांवर तंबूत परतला. मोहम्मद रिझवान 21 धावांचे योगदान देऊ शकला... आघाडीच्या फलंदाजांची ही अवस्था झाल्यामुळे आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तान संघाची चिंता वाढली आहे.
आशिया चषक 2023 पूर्वी श्रीलंकामध्ये पाकिस्तान आणि आफगाणिस्तान यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु आहे. ही वनडे मालिका म्हणजे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकाची रंगीत तालीम होय. पण पहिल्याच एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाची फलंदाजी ढेपाळली. हम्बनटोटा येथे सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानची टॉप ऑर्डर अपयशी ठरली. अवघ्या 62 धावांत पाकिस्तानचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले. फखर जमान 02, बाबर आझम 00, आगा सलमान 07 आणि मोहम्मद रिजवान 21 धावा काढून बाद झाले.
163 धावांत पाकिस्तान संघाने आठ विकेट गमावल्या आहेत. इमाम उल हकचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला अर्धशतक ठोकता आले नाही. इमाम उल हक याने 61 धावांची खेळी केली. हम्बनटोटा येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण आफगाणिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. इमामचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. आशिया चषकाआधी दोन्ही संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. पहिल्याच सामन्यात आफगाणिस्तान संघ वरचढ झाल्याचे दितेय. शादाब खान याने तळाच्या फलंदाजाला साथीला घेत पाकिस्तानची धावसंख्या वाढवली आहे. शादाबच्या फिनिशिंग टचमुळे पाकिस्तान संघ सन्मानजनक धावसंख्याकडे आगेकूच करत आहे.