Yuzvendra Chahal Reaction Not Getting Place In Asia Cup Team : आशिया चषकासाठी युजवेंद्र चहल याची निवड करण्यात आलेली नाही. त्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेकांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघात फक्त एकच प्रमुख फिरकी गोलंदाज असल्यामुळे अनेकांनी टीकेची झोड उडवली आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाचे शिलेदार निवडल्यानंतर युजवेंद्र चहल याने सूचक प्रतिक्रिया दिली आहे. चहल याचे ट्वीट सध्या चर्चेचा विषय आहे. 


आशिया चषकासाठी कुलदीप यादव प्रमुख भारताचा फिरकी गोलंदाज असेल. त्याच्या जोडीला अष्टपैलू रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. पण कुलदीप यादव याचा बॅकअप फिरकी गोलंदाज निवडलेला नाही. आशिया चषकाची निवड झाल्यानंतर चहल याने ट्वीट करत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे ट्वीट सध्या चर्चेत आहे. चहल याने इमोजीद्वारे आपलं मत व्यक्त केलेय. चहल याने पोस्ट केलेल्या एका इमोजीमध्ये सूर्य ढगांच्या मागे लपलेला दिसतो. एकीकडे बाण दाखवत त्याने लखलखत्या सूर्याकडे बोट दाखवले आहे. लवकरच तो पुन्हा चमकू शकेल, दमदार कमबॅक करेल,  असा संदेश चहल देत असल्याचे ट्वीटवरुन समजतेय. 






वर्षभरात फक्त दोनच वनडे खेळला चहल - 
2023 मध्ये चहलला फक्त 2 वनडे खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने एक श्रीलंकेविरुद्ध तर दुसरा न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळला आहे. चहलला 2022 मध्ये एकूण 14 एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने 27.10 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या आहेत. 
 
अक्षर पटेलला का दिली संधी ?


भारतीय संघाच्या निवडीदरम्यान लेग-स्पिनर आणि ऑफ-स्पिनर दोघांसाठीही चर्चा झाली. पण आम्हाला अशा खेळाडूची निवड करायची होती ज्याच्याकडे 8 किंवा 9 क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे.  अक्षरने या वर्षात आतापर्यंत कमालीची कामगिरी केली आहे. त्याला संघात घेतल्याने आम्हाला डावखुरा खेळाडूचा पर्यायही मिळतो, ज्याच्याकडे वरतीही फलंदाजी करण्याची क्षमताही आहे. निवडीच्या वेळीही आम्ही अश्विन आणि चहलबद्दल चर्चा केली होती. पण फक्त १७ खेळाडूंचा समावेश असल्याने आम्ही स्थान देऊ शकलो नाही. पण आशिया चषकात संधी मिळाली नाही म्हणजे विश्वचषकासाठी अश्विन-चहल आणि सुंदर यांची दारे बंद झाली असे नाही, असे रोहित शर्मा म्हणाला.


आशिया चषकासाठी भारताचा संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)