शारजा : अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (AFG vs SA) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांना महागात पडला आहे. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीपुढं दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. आफ्रिकेच्या फलंदाजांना धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये आफ्रिकेच्या संघानं 7 विकेट गमावून 36 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ 106 धावांवर बाद झाला. विशेष बाब म्हणजे आफ्रिकेच्या चार फलंदाजांना भोपळा देखील फोडता आला नाही.
शारजा येथील क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. फलजहक फारुकी आणि अल्लाह गजनफर यांनी भेदक मारा केला. यामुळं आफ्रिकेचा संघ 50 धावा तरी करेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.दक्षिण आफ्रिकेनं 36 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. वियान मुल्डरच्या अर्धशतकामुळं दक्षिण आफ्रिकेची लाज वाजली. फारुकीनं 4 विकेट घेतल्या तर गजनफर यानं 3 विकेट घेतल्या. राशिद खान यानं दोन विकेट घेत आफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं.
दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला
दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्याचा त्यांना फायदा झाला नाही. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का 17 धावांवर बसला. रीजा हैड्रिंक् 12 धावा करुन बाद झाला. यानंतर कॅप्टन एडन मार्करम देखील 2 धावा करुन बाद झाला. यानंतर टोनी जॉर्जी 11 धावा करुन बाद झाला. या तीन विकेट फारुकी यानं घेतल्या. तर, गजनफर यानं ट्रिस्टन स्टब्स, काइल वेर्रेने आणि जेसन स्मिथला बाद केलं. एंडिले फेहलुकवायो शुन्यावर बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेनं 36 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर वियान मुल्डर आणि ब्योर्न फोर्टुइन या दोघांनी केलेल्या भागिदारीमुळं दक्षिण आफ्रिकेचा संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. मुल्डरनं 52 धावा केल्या. फारुकी यानं त्याला बाद केलं. दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना भोपळा देखील फोडता आला नाही.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तान समोर विजयासाठी 107 धावांच आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्तानचा विकेटकीपर आणि सलामीवर असलेल्या रहमानुल्लाह गुरबाझ देखील शुन्यावर बाद झाला. अफगाणिस्तानचा संघ आज दक्षिण आफ्रिकेला पराभूत करतो का हे पाहावं लागेल.
इतर बातम्या :