शारजा : दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु झाली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं या मालिकेत 1-0 असा विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला 106 धावांवर बाद केलं. त्यानंतर 4 बाद 107 धावा करत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेवर एकदिवसीय सामन्यात पहिला विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानच्या विजयानं क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर झाला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट टीमला यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, आज दक्षिण आफ्रिकेला 6 विकेटनं पराभूत करत अफगाणिस्ताननं क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर केला आहे.
दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, फजलहक फारुकी आणि अल्लाह गजनफर या दोघांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. फारुकीनं चार विकेट घेतल्या तर गजनफर यानं तीन विकेट घेतल्या. तर, राशिद खान यानं दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वियान मुल्डर यानं 52 धावांची खेळी केल्यानं त्यांना शंभर धावांचा टप्पा ओलांडता आला.
अफगाणिस्ताननं 26 ओव्हरमध्ये 4 विकेटवर 107 धावा करत विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्ताननं क्रिकेट विश्वात उलटफेर केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान तिसऱ्यांदा आमने सामने आले होते. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 आणि 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आमने सामने आले होते त्यावेळी दक्षिण आफ्रिकेनं सामना जिंकला होता. आज अफगाणिस्ताननं विजय मिळवला.
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिलीच मालिका सुरु आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्ताननं 6 विकेटनं विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी ठेवलेल्या 107 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची खराब सुरुवात झाली होती. रहमानुल्लाह गुरबाज शुन्यावर बाद झाला होता. गुलबदीन नईब आणि आझमतुल्लाह उमरजई या दोघांनी अफगाणिस्तानला विजयापर्यंत पोहोचवलं. नईबनं 34 आणि उमरजई यानं 25 धावा केल्या.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये लढत झाली होती. त्या लढतीत दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला 9 विकेटनं पराभूत केलं होतं. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये झालेल्या लढतीत अफगाणिस्ताननं विजय मिळवला आहे. याशिवाय या मालिकेत अजून दोन सामने शिल्लक आहेत.
इतर बातम्या :