Asia Cup 2023 : आशिया चषकाला अवघे काही तास शिल्लक आहेत, त्याआधीच गतविजेत्या श्रीलंका संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रीलंकेचे आघाडीचे चार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेले आहेत. आघाडीचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे श्रीलंका संघाची गोलंदाजी कमकुवत झाली आहे, त्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. 


दुश्मन्था चमीरा, धनुष्‍का गुणतिलका, वानिंदू हसंरगा आणि दिलशान मधुशंका आशिया चषकातून बाहेर गेले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने  दुश्मन्था चमीरा आणि धनुष्‍का गुणतिलका यांची रिप्लेसमेंट जाहीर केली होती. त्यानंतर आता दिलशान मधुशंका दुखापतग्रस्त झालाय.  आशिया चषक आणि विश्वचषकाआधी दिलशान मधुशंका दुखापतग्रस्त झाल्यामुळे श्रीलंका संघ अडचणीत सापडला आहे. आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच, पण याच स्पर्धेत आघाडीचे चार खेळाडू खेळणार नाहीत. त्यामुळे श्रीलंका संघ कशी रणनिती करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 


गतविजेते अडचणीत - 


दुखापतीमुळे गतविजेता श्रीलंका संघ अडचणीत सापडलाय. गतवर्षी दाशुन शनाकाच्या नेतृत्वातील श्रीलंका संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषकावर नाव कोरले होते. यंदा श्रीलंकेसाठी जमेची बाजू म्हणजे, आशिया चषकातील बहुतांश सामने श्रीलंकेतच होणार आहेत. त्यामुळे श्रीलंका संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.  






आशिया चषक कधीपासून ?


आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने आशिया चषकाचा शुभारंभ होईल. यंदाचा आशिया चषक वनडे फॉर्मेटमध्ये हायब्रिड मॉडेलनुसार होणार आहे. भारताचे सर्व सामने श्रीलंकामध्ये होणार आहे.  सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. अ ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघाचा समावेश आहे. तर ब गटामध्ये बांगलादेश, आफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ असतील. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. 13 सामन्यानंतर आशियाचा किंग कोण यावरुन पडदा उठेल. 


कुठे पाहाता येणार सामने?


31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील.