Rohit Sharma : मायदेशात होणाऱ्या वनडे विश्वचषकाचा माहोल तयार होत आहे. भारतासह जगभरातील क्रीडा चाहते आणि माजी क्रिकेटपटूंकडून याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकाचा दबाव कर्णधार रोहित शर्माला चांगलाच माहित आहे. त्यामुळे रोहित शर्मा या दबावाला आणि त्याबाबतच्या चर्चेपासून दूर ठेवत आहे. कारण भारतात होणाऱ्या विश्वचषक विजयासाठी रोहित आणि टीम प्रयत्नशील आहे. 36 वर्षीय रोहित शर्माच्या खांद्यावर 140 कोटी भारतीयांच्या आपेक्षांचे ओझं आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ होणार आहे.  8 ऑक्टोबरपासून भारताचे विश्वचषक अभियान सुरु आहे. त्याआधी भारतीय संघ आशिया चषकात खेळत आहे. बेंगलोर येथील एनसीएमध्ये भारतीय संघ सराव करत आहे. त्यापूर्वी रोहित शर्माने पीटीआयसोबत चर्चा केली आहे. त्यामध्ये त्याने स्वत: आणि टीम इंडियाच्या भूमिकेबाबत स्पष्ट शब्दात उत्तरे दिली. " मला स्वत:ला रिलॅक्स ठेवायचेय. बाहेर काय चाललेय? सकारात्मक किंवा नकारात्मक चर्चेपासून दूर ठेवायचे आहे. माझ्यासाठी स्वत:सह आरामदायक असणे आणि सकारात्मक किंवा नकारात्मक भूमिका निभावणाऱ्या बाह्य घटकांची चिंता न करणे महत्त्वाचे आहे. तसेच 2019 च्या विश्वचषकापूर्वी मी ज्या फॉर्मात होतो त्या फॉर्ममध्ये मला परत जायचे आहे, असे रोहित शर्मा म्हणाला. " 2019 च्या विश्वचषकात माझी मानसिक स्थिती मजबूत होती. तसेच विश्वचषकाची तयारीही खूप केली होती, असेही रोहित शर्मा म्हणाला. 219 च्या विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतकांच्या मदतीने 648 धावांचा पाऊस पाडला होता. 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद होती. 

 

2019 च्या विश्वचषकात मी चांगल्या लयीत होतो. त्याशिवाय माझी मानसिक स्थितीही मजबूत होती. ती स्थिती पुन्हा व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी माझ्याकडे खूप वेळ आहे. 2019 मध्ये झालेल्या सर्व चांगल्या गोष्टी पुन्हा करायच्या आहेत, असे रोहित शर्मा म्हणाला. एक महिन्याचं क्रिकेट खेळाडू बनवू शकतो अथवा बिघडवू शकतो. एका रात्रीत यश आणि अपयशाच्या व्याख्या बदलत नाहीत, असेही रोहितने सांगितले. 

 

कोणताही निकाल अथवा चॅम्पियनशीप व्यक्ती म्हणून मला बदलू शकत नाही. एक व्यक्ती म्हणून मागील 16 वर्षांत मी बदललो नाही. कोणत्याही बदलाची गरज मला वाटत नाही. पुढील दोन महिन्यात संघासाठी काय करु शकतो, विश्वचषक विजयाचे लक्ष आहे, यावर सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. कोणताही व्यक्ती एक अथवा दोन महिन्यात बदलत नाही, असे रोहितने सांगितले. 

 

कोणती संख्या अथवा निकालावर मी जास्त विश्वास ठेवत नाही. स्वत:वर विश्वास ठेवायला हवं आणि येणाऱ्या वेळाचा आणि खेळाचा आनंद घ्यायला हवा, असेही रोहित शर्माने सांगितले.