37th National Games : महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी सातव्या दिवशी जलतरण, टेबल टेनिस, कुस्ती, नौकानयन, अॅथलेटिक्स, टेनिस आणि तायक्वांदो क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची लयलूट करीत पदकांच्या दीडशतकाकडे वाटचाल केली आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत ५६ सुवर्ण, ४३ रौप्य आणि ४३ कांस्यपदकांसह एकूण १४२ पदके जिंकत पदकतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे. सेनादल (३२ सुवर्ण, १२ रौप्य, ११ कांस्य) दुसऱ्या आणि हरयाणा (२४ सुवर्ण, १८ रौप्य, २३ कांस्य) तिसऱ्या स्थानावर आहेत. स्वस्तिका घोष आणि श्रुती अमृते जोडीने महिला दुहेरी टेबल टेनिसच्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. टेबल टेनिसमध्ये आणखी दोन कांस्य पदके खात्यावर आली. प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये ईशा वाघमोडेने सुवर्णपदक जिंकले तर ऋतिका श्रीरामने रौप्यपदक पटकावले. याचप्रमाणे महिलांच्या चार बाय २०० मीटर्स फ्री स्टाईल रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी रौप्यपदक जिंकले. जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एकूण एक सुवर्ण आणि दोन रौप्य अशी तीन पदके पटकावली. अॅथलेटिक्समध्ये संजीवनी जाधवने पाच हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकून वैयक्तिक दुसरे पदक पटकावले. नौकानयनमध्ये दत्तू भोकनळने रौप्य पदक जिंकले. महाराष्ट्राने या क्रीडा प्रकारात दोन रौप्य, दोन कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या मल्लांनी दोन रौप्य व तीन कांस्य अशी एकूण पाच पदके जिंकून कुस्तीमधील पहिल्या दिवशी शानदार कामगिरी केली. महिला टेनिस संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर महिला पुमसे संघाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदोमध्ये कांस्यपदक मिळाले.
टेबल टेनिस- स्वस्तिका-श्रुती जोडीला महिला दुहेरीचे सुवर्णपदक
महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष आणि श्रुती अमृते जोडीने बुधवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला दुहेरी टेबल टेनिसच्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. श्रुतीने जश मोदीच्या साथीने मिश्र दुहेरीत कांस्य पदक जिंकून दुहेरी यश मिळवले. याचप्रमाणे सानिल शेट्टी आणि सिद्धेश पांडे जोडीला पुरुष दुहेरीत कांस्यपदक मिळाले. टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि दोन कांस्य अशी एकूण तीन पदके पटकावली.
महिला दुहेरीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका-श्रुती जोडीने अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या सागरिका मुखर्जी आणि कौशानी नाथ जोडीचे कडवे आव्हान ३-० (११-७, ११-२,१२-१०) असे मोडीत काढले.
मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत पराभवामुळे श्रुती आणि जश जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालच्या कौशानी आणि अंकुर भट्टाचार्य जोडीने श्रुती-जश जोडीचा ३-१ असा पराभव केला. महाराष्ट्राच्या सनील शेट्टी आणि दिया चितळे जोडीने पश्चिम बंगालच्या अनिर्बन घोष आणि मौमा दास जोडीला ३-१ असे हरवून अंतिम फेरीत स्थान पक्के केले. पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात सानिल आणि सिद्धेशने पराभव पत्करला. पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्य आणि अनिर्बन् घोष जोडीने त्यांना ३-१ (११-७, ११-१३, ११-७, १३-११) असे चुरशीच्या सामन्यात नमवले. महिला एकेरीत दिया आणि स्वस्तिका यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. या दोघींमध्ये गुरुवारी सामना होईल. दियाने उपांत्यपूर्व सामन्यात तामिळनाडूच्या ग्लॅडलिन सागायावर ४-० (११-९, १२-१०, ११-५, ११-५) असा शानदार विजय मिळवला. तर स्वस्तिकाने काव्या श्री बसाकला ४-० (११-५, १७-१५, ११-८, ११-६) असे पराभूत केले.
डायव्हिंगमध्ये ईशाला सुवर्ण तर ऋतिकाला रौप्य
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी डायव्हिंगमध्ये पदकांची मालिका कायम राखताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी एक सुवर्ण व एक रौप्य अशी दोन पदके जिंकली. प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये २० वर्षाची खेळाडू ईशा वाघमोडेने सुवर्णपदक जिंकले तर ऋतिका श्रीरामने रौप्यपदक पटकावले. याचप्रमाणे महिलांच्या चार बाय २०० मीटर्स फ्री स्टाईल रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी रौप्यपदक जिंकून दिवसाची यशस्वी सांगता केली. जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एकूण एक सुवर्ण आणि दोन रौप्य अशी तीन पदके पटकावली. ईशाने १८२.७५ गुण नोंदवले तर ऋतिकाला १७७.३० गुण मिळाले. काल ऋतिकाने स्प्रिंग बोर्ड प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. ती सोलापूर येथील खेळाडू असून मनीष भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. वयाच्या नवव्या वर्षापासूनच ती या क्रीडा प्रकारात आहे. गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दोन कांस्यपदके जिंकली होती. ती मुंबईत रेल्वे खात्यामध्ये खेळाडू कार्यरत आहे. आजपर्यंत तिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भरघोस पदके जिंकली आहेत. प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये राघवी रामानुजन, अवंतिका चव्हाण, धृती अहिरवाल व आदिती हेगडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने ही शर्यत ९ मिनिटे, ३.५२ सेकंदांत पार केली. कर्नाटक संघाने हे अंतर ८ मिनिटे, ४९.७४ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.
वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राची विजयी घोडदौड
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वॉटर पोलो मध्ये पुरुषांच्या गटात सलग दुसरा विजय नोंदविताना आज कर्नाटक संघाचा १३-२ असा धुव्वा उडविला. काल महाराष्ट्राने मणिपूरला २८-३ अशी धूळ चारली होती.
अॅथलेटिक्स - पाच हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत संजीवनी जाधवला रौप्यपदक
महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने पाच हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वैयक्तिक दुसरे पदक पटकावले. संजीवनीने ही शर्यत १५ मिनिटे, ५०.३३ सेकंदांत पूर्ण केली. हिमाचल प्रदेशच्या सीमा कुमारीने हे अंतर १५ मिनिटे, ४४.०५ सेकंदांत पार करीत सुवर्णपदक जिंकले, तर गुजरातच्या दृष्टी चौधरीला (१५ मिनिट, ५८.६० सेकंद) कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या पूनम सोनूने हिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिला ही शर्यत पार करण्यासाठी १६ मिनिटे ४२.८४ सेकंद वेळ लागला. संजीवनीने याआधी या स्पर्धेतील १० हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. त्या शर्यतीत पूनमला कांस्यपदक मिळाले होते, तर सीमा कुमारीनेच विजेतेपद मिळवले होते.
कुस्ती - महाराष्ट्राचे पदकांचे पंचक
महाराष्ट्राच्या मल्लांनी दोन रौप्य व तीन कांस्य अशी एकूण पाच पदके जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कुस्तीमधील पहिल्या दिवशी शानदार कामगिरी केली. पुरुषांच्या ५७ किलो गटात अमोल बोंगारडेने रौप्य पदक पटकावले, तर १३० किलो गटात तुषार दुबे हा रौप्यपदकाचा मानकरी ठरला. ६७ किलो गटात विनायक पाटीलने कांस्यपदकाची कमाई केली.
महिलांच्या विभागात भाग्यश्री फंडने ६२ किलो गटात कांस्यपदकाची कमाई केली तर ७६ किलो गटात अमृता पुजारीला कांस्यपदक मिळाले.