1983 World Cup : 25 जून हा भारतीय क्रिकेटसाठी नेहमीच अविस्मरणीय दिवस असेल. 1983 साली याच दिवशी कपिल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभूत करुन विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. हे भारताचे पहिलेच विश्वचषक जेतेपद असल्याने सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. वेस्ट इंडिजबरोबरच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने बर्‍याच संघर्षानंतर विजय मिळविला. या निमित्ताने 1983 च्या चॅम्पियन टीमच्या सर्व सदस्यांनी एबीपी न्यूजशी विशेष संवाद साधला. यादरम्यान त्यांने असे काही किस्से सांगितले, जे अजूनही ऐकायला मिळत नाहीत.


1983 वर्ल्ड कपची संपूर्ण टीम जमली
या ऐतिहासिक दिवसाला 38 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा प्रसंग खास करण्यासाठी 1983 च्या विश्वचषक चँपियन संघातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वर्ल्ड कपवरील पुस्तकाच्या लॉन्चची घोषणा केली. यात टीम इंडियाच्या न ऐकलेल्या किस्से लिहिले आहेत.


कपिल देव यांनी सांगितला किस्सा
त्यावेळी संघाचा कर्णधार असलेले कपिल देव म्हणाले की, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जेव्हा ते एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात येत होते. त्यावेळी फ्लाइटमध्ये टीमसाठी खास केकची व्यवस्था केली होती. सर्व प्रथम तिथे संघाने सेलिब्रेशन केलं. यानंतर मुंबईत आल्यानंतरही टीम वानखेडे स्टेडियमवर पोहोचली जिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हजारो लोकांच्या गर्दीत पोहचल्यानंतर त्यांनी आपण काय कामगिरी केली याची जाणीव झाली.


श्रीकांतने गायलं गाणं 
1983 च्या विश्वचषक चॅम्पियन संघाचा एक भाग असलेले श्रीकांत यांनी 38 वर्षे पूर्ण झाल्यावर गाणे गाऊन आनंद व्यक्त केला. श्रीकांत यांची हिंदी चांगली नाही आणि म्हणून त्यांनी मोडक्यातोडक्या हिंदीमध्ये गायलं. हे ऐकून संघातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.


प्रत्येक खेळाडूचा आपला वेगळा किस्सा
1983 विश्वचषक विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूची स्वतःची वेगळी कथा आहे. काहींनी गोलंदाजी करून काहींनी फलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. प्रत्येकाच्या परिश्रमामुळे टीम इंडियाने वेस्ट इंडिजला हरवून इतिहास रचला. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ खूप मजबूत होता आणि त्यांनी दोनदा विश्वचषक जिंकला होता. अशा परिस्थितीत, त्यांचा पराभव करणे ही एक मोठी कामगिरी होती.