मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या अनेक निर्बंधांचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसल्याचं पाहायला मिळालं होतं. क्रिकेटच्या मैदानांपासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत याचे पडसाद उमटले होते. पण, अखेर खेळाडूंना मोठा दिलासा देत महाराष्ट्र राज्य शासनानं क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे.


कोरोना नियमांचं पालन करावं अशी सूचनाही शासनाकडून करण्यात आली आहे. या निर्णयामुळं नऊ महिन्यांनंतर आता खेळाडू पुन्हा एकदा त्यांच्या करिअरच्या वाटांवर लक्ष केंद्रीत करु शकणार आहेत.मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बॅडमिंटन असोसिएशन यांनी आखून दिलेल्या काही नियमांचं पालन खेळाडूंना करणं बंधनकारक असणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळं क्रीडा क्षेत्रावर करिअर अवलंबून असणाऱ्यांना दिलासाच मिळाला आहे.


विविध खेळांमध्ये सक्रीय असणाऱ्या खेळाडूंना ट्रेनिंगसाठी (सरावमान्यता) सशर्त परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळत विविध प्रवर्गांमध्ये ही मान्यता देण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क नसलेले आर्चरी, सायकलिंग, तलवारबाजी, शूटींग ; मध्यम संपर्क असलेले क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, अधिक संपर्क असणारे कराटे, कुस्ती, बॉक्सिंग, कबड्डी अशा खेळांच्या सरावाकरता परवानगी दिली आहे.


   ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जारी; स्पर्धेत कोणत्या संघाशी होणार भारताचे सामने?


सरावाच्या ठिकाणी 10 ते 15 खेळाडूंनी नेमून दिलेल्या जागेत सराव करणं अपेक्षित असणार आहे. तर, 14 वर्षांखालील खेळाडूंसाठी सरावाच्या वेगळ्या वेळा आखण्यात येतील. याशिवाय खेळाडू किंवा पालक यांपैकी कोणालाही कोविडची लक्षणं दिसल्यास त्यांना सरावाच्या ठिकाणी येण्यास सक्त मनाई असेल.