मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जारी केलं आहे. शेड्यूलनुसार, या स्पर्धेमध्ये एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना 4 मार्च, 2022 रोजी वेलिंगटनच्या बेसिन रिझर्व्हमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच या टुर्नामेंटमधील अंतिम सामना 3 एप्रिल, 2022 रोजी न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चच्या हेगली ओवल ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाबाबत माहिती दिली आहे.
या सीरीजसाठी 6 शहरांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपचे सीईओ एंड्रिया नेल्सन म्हणाले की, "आम्ही या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. लवकरच जगाला एक नवा चॅम्पियन मिळणार आहे." ते पुढे बोलताना म्हणाले की, "माझी इच्छा आहे की, लोकांनी ही स्पर्धा पाहावी आणि आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहन द्यावं."
या वर्ल्डकपमध्ये सात सामने खेळणार भारत
गेल्या वर्ल्डकपमधील विजेता संघ इंग्लंड मार्चला सेडोन पार्कमध्ये रंगलेल्या सामन्यातील आपला प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध स्पर्धेची सुरुवात करणार आहे. तर भारत या वर्ल्डकपमध्ये एकूण सात सामने खेळणार आहे. भारताचे चार सामने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिका आणि इंग्लंडच्य विरुद्ध होणार आहेत. तर उरलेले तीन सामने क्वॉलिफायर संघांसोबत खेळवण्यात येतील. भारतीय महिला क्रिकेट संघाची जबाबदारी मिताली राजच्या खांद्यावर सोपावण्यात येणार आहे.
2017 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने उपविजेते पदाचा बहुमान
दरम्यान, 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपचा किताब आपल्या नावे केला होता. तर 2009 मध्ये इंग्लंडने वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2013 मध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला. तर 2017 मध्ये इंग्लंडने वर्ल्डकप आपल्या नावे केला होता. 2017 मध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला होता.