परभणी : एकीकडे अगोदरच केंद्राने आणलेल्या कृषी कायद्या विरोधात प्रखर आंदोलन सुरु आहे. या कायद्यातील नियमनमुक्त शेतमाल विक्रीचा मुद्दाही आंदोलकांनी लावून धरला आहे. शेतकरी माल कुठेही विक्री करू शकतो, मात्र त्या मालाचे पैसे मिळण्यासंदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे हा मुद्दा वादग्रस्त ठरतोय. ज्यासाठी आंदोलन सुरुच आहे. दुसरीकडे असे प्रकरण ही समोर येऊ लागले आहेत. परभणीच्या जिंतूरमध्ये 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून दोन भामट्या व्यापाऱ्यांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी
पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


परभणीच्या जिंतूर तालुक्यातील शेवडी गावातील शेतकर्‍यांची हळद आणि सोयाबीन 25 जून रोजी अमोलअप्पा एकशिंगे आणि बाळूअप्पा एकशिंगे या दोघांनी इतरांपेक्षा 200 ते 300 रुपये जास्त भाव देतो म्हणून आडत दुकानासाठी खरेदी केले होते. गावातील शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करत कच्च्या पावत्या करून पैसे थोड्या दिवसांनी देतो असे म्हटले. शिवाय अनेकांना सप्टेंबर महिन्याचे चेक ही दिले होते. ज्यावर सर्वांनी विश्वास ठेवला. जवळपास 30 लाख 87 हजार 644 रुपयांचे सोयाबीन आणि हळद या दोघांनी खरेदी केली होती. जून महिन्यात हा व्यवहार झाला होता. आडतीसाठी खरेदी असल्याने पैसेनंतर देतो, असे त्यांनी सर्वांना म्हटले. मात्र,अद्यापही शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळाले नाहीत. जे चेक दिले होते ते बँकेत वटलेही नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी पैश्यांसाठी त्यांना संपर्क केला असता दोघांचेही मोबाईल बंद लागले. विशेष म्हणजे त्यांनी आडत दुकान बंद केले. त्यांचा कुठेच संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात आले. बुधवारी बालाजी आश्रोबा घुगे यांच्यासह परिसरातील पंधराहून अधिक शेतकर्‍यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात वरील दोघांनी 30 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी हे करीत आहेत.


केवळ शेवडीच नाही तर आसपासच्या 10 ते 15 गावांतील शेतकऱ्यांची फसवणूक


या दोन्ही भामट्या व्यापाऱ्यांनी केवळ शेवडीच नाही तर इतर 10 ते 15 गावांतील शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचंही आता समोर आलं आहे. पोलीस या दोघा भामट्यांचा शोध घेत आहेत. अशाच पद्धतीने अन्य कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी जिंतूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :