पणजी : गोव्यात फुटबॉलप्रेमींची अजिबात कमतरता नाही. गोव्याला फुटबॉल पंढरी म्हणून देखील ओळखले जाते. पोर्तुगाल आणि ब्राझिलचे अनेक चाहते गोव्यात आहेत. फिफा विश्वचषकात यंदा क्रोएशियाने अंतिम फेरी गाठल्यानंतर गोवेकर क्रोएशिया समर्थक बनले आहेत. कोणताही संबंध नसताना गोव्यात क्रोएशिया समर्थक कसे निर्माण झाले असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर त्यांच्या उत्तरासाठी 450 वर्षे मागे जावे लागेल.


क्रोएशियन पोर्तुगीजांच्या सोबत गोव्यात आले

450 वर्षे गोव्यावर राज्य केलेल्या पोर्तुगीजांनी आपली जहाजे बनवून घेण्यासाठी क्रोएशियन लोकांना गोव्यात बोलावून घेतले होते. पोर्तुगीज काळात जुने गोवे हे सत्ता केंद्र होते. जुने गोवे येथून जेमतेम पाच किमी अंतरावर असलेल्या कुंभारजुवे आणि गवंडळी गावात तेथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जहाज बांधणीची कामे सुरु केली.

ही कामे करण्यासाठी आलेल्या क्रोएशियन लोकांनी गवंडळी गावात वास्तव्य केले होते. जवळपास 12 हजार क्रोएशियन लोक त्या काळी गवंडळी येथे वास्तव्याला होते. याच दरम्यान क्रोएशियन लोकांनी साव ब्राझ चर्च उभारले. त्यापूर्वी तेथे छोटे कपेल होते. क्रोएशीयात Dubrovnik येथे जसे चर्च आहे, त्याची हुबेहब प्रतिकृती गवंडळी येथे साकारण्यात आली आहे. त्या काळात या भागात वास्तव्यास असलेल्या हिंदू लोकांचे धर्मांतरण करण्यात आले होते. त्यामुळे आज देखील अनेक ख्रिश्चन धर्मीयांचे हिंदूंशी रक्ताचे नाते आहे.

गोव्यात पोर्तुगीजांची राजवट असल्याने पोर्तुगाल समर्थक फुटबॉल प्रेमी आहेत. त्याचबरोबर बरेच जण ब्राझिलचे देखील चाहते आहेत. क्रोएशियाने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर गोव्यात असलेले क्रोएशिया समर्थक उजेडात आले आहेत.

क्रोएशियाच्या विजयासाठी चर्चमध्ये प्रार्थना

गवंडळी गावातील क्रोएशिया समर्थक सध्या जाम खुश आहेत. त्यांच्या भागात वास्तव्यास असलेल्या क्रोएशियाचा संघ फीफाच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने सगळे समर्थक उत्साहीत झाले आहेत. रविवारची सुट्टी असल्याने उद्या सर्व जण टीव्हीवर फायनल पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

क्रोएशिया संघ फीफा वर्ल्ड कप जिंकावा म्हणून उद्या सकाळी सव्वा सात वाजता चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा होणार आहे.

Zdravka Matisic या क्रोएशियाने या महिला अभ्यासकाने क्रोएशियाचे गोव्याशी असलेले संबंध जगासमोर आणले. दिल्ली येथे संस्कृत शिकण्यासाठी आलेल्या Zdravka हिने गवंडळी गावाला भेट देऊन दोन्ही देशांना जोड़णाऱ्या चर्चच्या दुव्याची माहिती जगासमोर आणली होती.

1999 मध्ये क्रोएशियाच्या शिष्टमंडळाने गोव्यात येऊन गवंडळी चर्चला भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला होता. क्रोएशियन पर्यटक देखील अनेकदा या चर्चला भेट देत असतात.