Commonwealth Games 2022:  यंदा कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) स्पर्धा इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात पार पडणार आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी 322 सदस्यांची घोषणा केली असून यात 215 खेळाडू आणि 107 अधिकारी आणि सपोर्ट स्टाफ आहेत. यावेळी भारतासाठी सायकलिंग स्पर्धेत रोनाल्डो आणि बेकहॅम हे मैदानात उतरणार आहेत. आता हे वाचून तुम्हाला वाटेलं असेल की, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि डेविड बेकहॅम तर भारताकडून खेळत आहेत की काय? पण तसं काही नसून हे दोघे म्हणजे भारताचे सायकलिंगपटू रोनाल्डो सिंह (Ronaldo Singh) आणि डेविड बेकहॅम (David Beckham) हे आहेत. हे दोघेही सायकलिंग स्पर्धेसाठी भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहेत.


कोण आहेत रोनाल्डो सिंह आणि डेविड बेकहॅम?


तर भारतासाठी सायकलिंग स्पर्धेत सहभागी होणारा डेविड बेकहॅम हा 19 वर्षीय प्रोफेशनल सायकलिंगपटू असून तो अंदमान-निकोबार बेटावरील रहिवाशी आहे. त्याने गुवाहाटी येथे झालेल्या यूथ गेम्समध्ये 200 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. तर डेविडचे आजोबा हे इंग्लंड फुटबॉल संघाचा माजी कर्णधार डेविड बेकहॅमचे मोठे फॅन असल्याने त्यांनी आपल्या नातवाचं नावही डेविड बेकहॅम ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बात कार्यक्रमात बेकहॅमचा उल्लेख केला होता.


बेकहॅमसह रोनाल्डो हा देखील भारतासाठी सायकलिंग स्पर्धेत भाग घेत असून रोनाल्डो सिंह हा 20 वर्षीय मनिपूरमधील सायकलिंगपटू आहे. त्याने आशियाई सायकलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये रौप्यपदक मिळवलं होतं. त्याचंही नाव फुटबॉलपटूच्या नावावरुनच ठेवलं आहे. पण सध्याचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तीयानो रोनाल्डो नाही तर ब्राझीलचा माजी दिग्गज फुटबॉलर रोनाल्डिन्होच्या नावावर रोनाल्डो सिंहचं नाव ठेवण्यात आलं आहे. दरम्यान हे दोघेही सायकलिंगमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणार असून त्यांच्याकडून देशाला पदकाची अपेक्षा आहे.


15 खेळांमध्ये सहभागी होतील भारतीय खेळाडू


भारतीय खेळाडू 15 खेळ आणि चार पॅरा स्पोर्ट्समध्ये सहभाग घेणार आहे. बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि कुस्तीमध्ये भारताला पदकं मिळण्याची सर्वाधिक अपेक्षा आहे. हॉकी आणि महिला क्रिकेटमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज अधिकृतपणे 23 जुलै रोजी उघडेल. भारतीय सदस्य येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी असेल.


हे देखील वाचा-