India in Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या (Commonwealth Weightlifting Games 2022) आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत सहा पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये तीन सुवर्णपदकांसह एक रौप्य पदक आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दरदिवशी पदकं खिशात घालत आहेत.


यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सच्या अप्रतिम कामगिरीनंतर आता कुस्तीपटूंनीही विशेष कामगिरी केली. भारताच्या सहाच्या सहा कुस्तीपटूंनी पदकावर नाव कोरलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 26 वर गेली आहे. तसंच लॉन बाऊल्समध्ये पुरुषांच्या गटाने इंग्लंडला 13-12 ने मात देत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे.


पॅरा टेबल टेनिसमध्ये पदक निश्चित


दिवसभरात सर्वात आधी भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरीत (वर्ग 3-5) हे पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीच्या (Semifinal) सामन्यात तिने इंग्लंडच्या सू बेलीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवल्याने किमान रौप्यपदक निश्चित केलं आहे. भावीनाने इंग्लंडची खेळाडू सूचा 11-6,11-6,11-6 अशा तीन सेट्समध्ये मात देत एकतर्फी पराभव केला.या आधी भाविनाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही एकतर्फी विजय नोंदवला होता. तिने फिजीच्या अकानिसी लाटूवर 11-1, 11-5, 11-1 असा दमदार विजय मिळवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली होती.


बजरंग, दीपकसह साक्षीची सुवर्ण कामगिरी


यंदा भारताचे पुरुष आणि महिला कुस्तीपटू कमाल फॉर्ममध्ये दिसून येत आहेत. पुरुषांमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनियातर महिलांमध्ये साक्षी मलिक यांनी थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang punia) याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनील याला मात देत ही कामगिरी केली आहे. तर साक्षी मलिकने फ्री स्टाईल 62 किलोग्राम गटात सुवर्णपदक मिळवलं आहे. तिने कॅनडाच्या अॅना गोंझालेजला (Ana Godinez Gonzalez) मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. यानंतर 86 किलोग्राम गटात भारताच्या दीपक पुनियानं (Deepak Punia) पाकिस्तानच्या मुहम्मद इनामला नमवत सुवर्णपदक मिळवलं आहे. दीपकने मुहम्मद याला 3-0 च्या फरकाने मात देत पदक मिळवलं असून विशेष म्हणजे दीपक पुनियाचं हे पहिलं वहिलं कॉमनवेल्थमधील पदक आहे.


अंशूनं वाढदिवसादिवशी जिंकलं पदक


 कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मधील (Commonwealth Games 2022) भारतातं पहिलं कुस्ती खेळातील पदक महिला कुस्तीपटू अंशू मलिकने  (Anshu Malik) मिळवून दिलं आहे. 57 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात तिला नायजेरियाच्या Adekuoroye हिने मात दिल्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे आज अंशूचा वाढदिवस असून तिने भारत देशाला भेटवस्तू दिली आहे.


मोहितसह दिव्यानं कोरलं कांस्यपदकावर नाव


कॉमनवेल्थ स्पर्धेतील (Commonwealth Games 2022) आठवा दिवस भारताच्या कुस्तीपटूंसाठी अत्यंत खास ठरला. विशेष म्हणजे भारताच्या आज मैदानात उतरलेल्या सर्वच्या सर्व कुस्तीपटूंनी पदक नावे केलं आहे. पुरुषांच्या 125 किलोग्राम वजनी गटात मोहित ग्रेवालने कांस्य पदक नावे केलं आहे. आधीच्या सामन्यात पराभूत मोहितने आता जमाईकाच्या आरॉन जॉन्सनला (Aaron Johnson) मात देत कांस्य पदकावर नाव कोरंल आहे. त्याच्याच प्रमाणे महिलांच्या 68 किलोग्राम वजनी गटात दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवलं आहे. आधीच्या सामन्यात पराभूत झालेल्या दिव्याने तिसऱ्या स्थानासाठीचा सामना जिंकत कांस्य मिळवलं आहे. तिने टोंगाच्या टायगर लिली कॉकर लेमाली हिला मात देत पदक जिंकलं आहे. 


हिमा दास, महिला हॉकी संघाच्या पदरी निराशा


भारताची आघाडीची धावपटू हिमा दास महिला 200 मीटरच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी झाली आहे. तसंच भारतीय महिला हॉकी संघाला सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 3-0 नं मात दिली आहे.



हे देखील वाचा-