महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत मनूने 240.9 गुण कमवत सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर हीना सिद्धूने 234 गुणांची नोंद करत रौप्य पदक पटकावलं. त्यामुळे भारताला एकाच वेळी सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करता आली.
कौतुकास्पद म्हणजे हरियाणाची मनू भाकेर अवघी 16 वर्षांची आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पणातच तिने चमकदार कामगिरी केली.
मनूने आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषकातही 10 मीटर्स एअर पिस्टलमध्ये शेवटच्या शॉटवर सुवर्णपदक मिळवलं होतं.
पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारातही रवी कुमारने कांस्यपदक पटकावलं आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 94 किलो वजनी गटात विकास थालियानेही कांस्यपदक जिंकलं.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने अकरा पदकांची कमाई केली आहे. त्यापैकी सात पदकं वेटलिफ्टर्सनी पटकावली आहेत. भारताने आतापर्यंत सहा सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकाची कमाई केली आहे.
पहिल्या दिवशी वेटलिफ्टर गुरुराजाने रौप्यपदकाची कमाई करत भारताचं पदकांचं खातं उघडलं, तर वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्ण कमावून पहिलं गोल्ड मेडल मिळवण्याचा मान पटकावला.
दुसऱ्या दिवशी संजिता चानूने भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवत विश्वविक्रम रचला होता. तर अवघ्या 18 वर्षांचा वेटलिफ्टर दीपक लाथरने भारताच्या खात्यात कांस्य पदकाची भर घातली होती.
तिसऱ्या दिवशी सतीश शिवलिंगम आणि आर वेंकट राहुल यांनी सुवर्णपदक पटकावून भारतीयांची मान उंचावत ठेवली. त्यानंतर चौथ्या दिवसाची सुरुवात पूनम यादवच्या सुवर्णमयी कामगिरीने झाली. त्यानंतर नेमबाजीत एकाच इव्हेंटमध्ये सुवर्ण-रौप्यची कमाई 16 वर्षांची मनू भाकेर आणि हीना सिद्धू यांनी केली.
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी
नेमबाजी (महिला 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण
नेमबाजी (महिला 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य
नेमबाजी ( पुरुष 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य
वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य
वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य
वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य
गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी
भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.
2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकं आणि आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालंय 225 शिलेदारांचं भारतीय पथक.
संबंधित बातम्या :