मुंबई : आपल्या संवदेनशील लेखणीमुळे मराठी जनसमूहात मानाचं स्थान मिळवलेल्या लेखक अरविंद जगताप यांच्या एका पत्राचं ‘बालभारती’ने दहावी इयत्तेच्या मराठीच्या पुस्तकात समावेश केला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अरविंद जगताप यांनी लिहिलेले पत्र महाराष्ट्रभर पोहोचली. आता शालेय अभ्यासक्रमात सुद्धा अरविंद जगताप यांच्या पत्राला स्थान मिळाले आहे.


‘आप्पांचे पत्र’ या नावाने दहावी इयत्तेसाठी अरविंद जगताप यांच्या पत्राचा धडा आहे. यात विद्यार्थ्यांन उद्देशून शिपाई काकांनी पत्र लिहिले आहे. आपल्या नेहमीच्याच भिडणाऱ्या शब्दात अरविंद जगताप यांनी पत्र लिहिले आहे.

“कोणतेही काम श्रेष्ठ, कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा, कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा, यश तुम्हाला हमखास मिळेल.”, अशा या पत्रातून आप्पा नामक शिपाई काका विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात.

कलेचे माध्यमांतर होणे, हे नवीन नसले, तर अरविंद जगताप यांच्या पत्रलेखनाचं माध्यमांतर दखल घेण्याजोगे आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध व्यक्तींना लिहिलेले पत्र पुढे ‘पत्रास कारण की...’ नामक पुस्तकाच्या रुपात आले. ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तकही अत्यंत कमी कालावधीत मराठी वाचकांच्या पसंतीस उतरलं.

ईमेल, स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असताना, नव्या पिढीसाठी पत्र म्हणजे दंतकथा बनू पाहत आहे. अशा काळात अरविंद जगताप यांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या व्यासपीठावरुन आपल्या भिडणाऱ्या शब्दांमध्ये विविध व्यक्तींना पत्र लिहून अनेकांना या माध्यमाशी जोडून घेतले आहे.