सिडनी : दिमाखदार सोहळ्याने ऑस्ट्रेलियात आयोजित 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची आज सांगता झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 66 पदकं आपल्या खात्यात जमा केली. या पदकांसह भारत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.


भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने 80 सुवर्ण, 59 रौप्य आणि तितक्याच कांस्य पदकांची कमाई केली. त्या खालोखाल इंग्लंडने 45 सुवर्ण, 45 रौप्य आणि 46 कांस्य पदकांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं. तर भारताच्या खात्यात 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्यपदकांचा समावेश आहे.

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 71 देशांनी सहभाग घेतला होता. यातील 43 देशांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, सुवर्ण पदाकाच्या कमाईत भारताने कॅनेडालाही मागे टाकलं. कॅनेडाने यंदा 15 सुवर्ण पदकांची कमाई केली. तर भारताच्या खात्यात एकूण 26 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

2010 मधील 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडे यजमान पद असताना, 101 पदकांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं होतं. यात एकूण 38 सुवर्ण पदकांचा समावेश होता.

सायनाची सुवर्ण कामगिरी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालनं पी.व्ही. सिंधूला हरवत बाजी मारली. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात 21-18, 23-21 असे दोन सेट सरळ जिंकून सायनानं बाजी मारली, आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

किदांबी श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान

दुसरीकडे पुरुष एकेरी गटात वर्ल्ड नंबर वन किदांबी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीकांतचा मलेशियाच्या ली चोंग वी ने 19-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. या पराभवामुळे श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

मेरी कोमची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी

बॉक्सर मेरी कोमने राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित केला. 48 किलो वजनी गटात मेरी कोमने नॉर्दन आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात करत, नवा इतिहास लिहिला. कारण, राज्यभेत खासदार असल्याने, राष्ट्रकुलच्या इतिहासात कोणत्याही देशाच्या लोकप्रतिनिधीने सहभाग घेऊन सुवर्ण पदकाची कमाई करण्याची ही पहिलीच वेळ होती.

नववीत शिकणाऱ्या पठ्ठ्याला राष्ट्रकुलमध्ये गोल्ड मेडल!

या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, भारताच्या अवघ्या 15 वर्षाच्या म्हणजेच नववी/दहावीत शिकणाऱ्या पोराने नेमबाजीत राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. अनिश भानवालाने 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात विक्रमी कामगिरी करत सुवर्णभेद केला. अनिशने तब्बल 30 गुण मिळवत विक्रम रचला.

कोण म्हणतंय करिअर संपलं, तेजस्विनीने पुन्हा सोनं जिंकलं!

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने गोल्डन कामगिरी करत, करिअरची संपल्याची चर्चा करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकवालं. तिने वयाच्या 37 व्या वर्षी आपला फॉर्म आणि परफॉर्मन्स कायम ठेवत, जगाला आपली चमक दाखवून दिली.

वाघासारखी झुंज, चित्त्यासारखी झेप, पैलवान राहुलने राष्ट्रकुल गाजवलं!

महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने राष्ट्रकुलचं मैदान गाजवलं. बीडचा पैलवान आणि वस्ताद काका पवार यांचा पठ्ठ्या राहुल आवारेने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कामगिरी केली. राहुलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करत, आपल्या घरच्यांनाही भारावून टाकले. पोराने मरणाची, रात्रं दिवस तयारी केली होती, त्याचा आम्हाला खूपच अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया काका पवार यांनी दिली.

बबिताकुमारीची रौप्यपदकाची कमाई

दंगल सिनेमानंतर सर्वाधिक प्रकाशझोतात आलेल्या गीता-बबिता जोडीपैकी बबितानेही आपली चमक यंदा दाखवून दिली. 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पैलवान बबिताकुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम सामन्यात तिला कॅनडाच्या डायना विकरने पराभूत केलं. त्यामुळे बबिताचं सुवर्णपदक हुकलं. पण महिलांच्या 53 किलो फ्री स्टाईल कुस्तीत बबिता कुमारीने सलग तीन विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली होती. त्यामुळे सलग तीन कुस्त्या खेळल्यामुळे, अंतिम सामन्यात बबिता काहीशी दमलेली दिसत होती.

...म्हणून महावीर फोगाट यांना बबिताची फायनल पाहता आली नाही!

दुसरीकडे तिचे वडील आणि कोच महावीर फोगाट हे 'दंगल' सिनेमाप्रमाणेच बबिताचा अंतिम सामना पाहू शकले नाही. पण यावेळी त्यांना कोणत्या खोलीत बंद करण्यात आलं नव्हतं. तर त्यांना या कुस्तीच्या सामन्यांचं शेवटच्या क्षणापर्यंत तिकीटच मिळू शकलं नाही.

गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी

भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरीही लक्षवेधक ठरली आहे.

2002 (मॅन्चेस्टर) - 69 पदकं

2006 (मेलबर्न) - 50 पदकं

2010 (दिल्ली) - 101 पदकं

2014 (ग्लास्गो) - 64 पदकं

2018 (सिडनी) – 66 पदकं

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी

बॅडमिंटन (महिला एकेरी) सायना नेहवा सुवर्ण

बॅडमिंटन (महिला एकेरी) पी.व्ही.सिंधू रौप्य

बॅडमिंटन (पुरुष एकेरी) किदांबी श्रीकांत रौप्य

बॉक्सिंग (महिला 48 किलो वजनी गट) मेरी कोम सुवर्ण

कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 65 किलो वजनी गट) बजरंग पुनिया सुवर्ण

कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) पूजा धांडा रौप्य

कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 68 किलो वजनी गट) दिव्या काकरन कांस्य

बॉक्सिंग (पुरुष 91 किलो वजनी गट) नमन तन्वर कांस्य

नेमबाजी (पुरुष 25 मीटर रॅपीड पिस्टल) अनिश भानवाला सुवर्ण

नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स) अंजुम मोदगिल रौप्य 

नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स) तेजस्विनी सावंत सुवर्ण

थाळीफेक - सीमा पुनिया रौप्य 

थाळीफेक - नवजीत धिल्लन कांस्य

कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 74 किलो वजनी गट) सुशीलकुमार सुवर्ण

कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 76 किलो वजनी गट) किरण कांस्य

कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) राहुल आवारे सुवर्ण

कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 53 किलो वजनी गट) बबिता फोगट रौप्य

नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल प्रोन) तेजस्विनी सावंत रौप्य

नेमबाजी (पुरुष डबल ट्रॅप) अंकुर मित्तल कांस्य

नेमबाजी (महिला डबल ट्रॅप) श्रेयसी सिंग सुवर्ण

नेमबाजी (पुरुष - 50 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

पॅरा-पॉवरलिफ्टिंग (हेवी वेट) सचिन चौधरी कांस्य

नेमबाजी (महिला - 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धू सुवर्ण

बॅडमिंटन (मिश्र) सुवर्ण

टेबलटेनिस (पुरुष) सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य

टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य

वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य