सोलापूर : भाजीत मीठ जास्त पडलं म्हणून पतीनं चक्क पत्नीचे केसच कापले. सोलापूर जिल्ह्यातल्या नान्नज गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीसोबत हे विकृत कृत्य करणाऱ्या आसिफ शेखविरोधात सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

11 एप्रिल रोजी पीडित पत्नीनं जेवणात पालकाची भाजी बनवली. कामावरुन आलेल्या पती आसिफला जेवायला वाढलं. यावेळी आसिफनं भाजीची स्तुती तर केली नाही, याउलट भाजीत मीठ जास्त पडलं म्हणून पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली आणि नंतर राग अनावर न झाल्यानं आसिफनं पत्नीच्या केसांवर कात्रीच फिरवली.

पतीचा हा असा संतापजनक प्रकार पाहून पत्नीनं जीव मुठीत घेऊन घरातून पळ काढला. माहेरच्या लोकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर यशोदा फाऊंडेशनच्या मदतीनं पत्नीनं नाईलाजास्तव सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार केली. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.