सेंट जॉर्ज : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा धावांचा पाऊस सुरुच आहे. इंग्लंडविरुद्ध बुधवारी खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात गेलने आणखी एक शतकी खेळी रचली. मात्र सेंट जॉर्ज वनडेमधील ख्रिस गेलचा झंझावात वेस्ट इंडिजच्या कामी आला नाही, आणि त्यांना हा सामना गमवावा लागला. पण गेलने षटकारांचा पाऊस पाडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करण्याचा पराक्रम केला.
39 वर्षीय गेलने 97 चेंडूंमध्ये 162 (14 षटकार, 11 चौकार) धावांची जबरदस्त खेळी केली. एकदिवसीय कारकीर्दीत 25व्या शतकी खेळीत गेलने सामन्यातील आठवा षटकार ठोकला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी+एकदिवसीय+ट्वेन्टी 20 आंतरराष्ट्रीय) 500 षटकारांच्या आकड्याला स्पर्श करणारा पहिला फलंदाज बनला. गेलने आतापर्यंत कसोटीमध्ये 98, एकदिवसीय सामन्यात 305 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 103 षटकार लगावले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
1. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) : 516 डाव, 506 षटकार
2. शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) : 508 डाव, 476 षटकार
3. ब्रेण्डन मॅक्युलम (न्यूझीलंड) : 474 डाव, 398 षटकार
4. महेंद्र सिंह धोनी (भारत) : 515 डाव, 352 षटकार
- सनथ जयसूर्या (श्रीलंका) : 651 डाव, 352 षटकार
5. रोहित शर्मा (भारत) : 328 डाव, 349 षटकार
यासोबतच ख्रिस गेलने (10,074 धावा) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या दहा हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने एकदिवसीय कारकीर्दीत ब्रायन लारानंतर (10, 405) दहा हजार धावांचा आकडा पार करणारा वेस्ट इंडिजचा दुसरा कॅरेबियन फलंदाज ठरला आहे. एकूण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांबाबत बोलायचं झालं तर दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो चौदावा फलंदाज ठरला आहे.
ख्रिस गेलने 85 चेंडूत आपल्या 150 धावा पूर्ण केल्या. संघ पराभवाच्या छायेत असताना एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद दीडशे धावा करण्याचा विक्रम गेलने केला. त्याने रिकी पॉण्टिंगला मागे टाकलं, पॉण्टिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2006 मध्ये 99 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या होत्या. परंतु ऑस्ट्रेलियाने हा सामना गमावला होता.
पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील चौथ्या मुकाबल्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असलेल्या इंग्लंडच्या संघाने 6 बाद 418 धावा अशी डोंगराएवढी धावसंख्या केली. इंग्लंडकडून कर्णधार इयान मॉर्गनने (88 चेंडूंमध्ये 103 धावा) आणि यष्टीरक्षक जोस बटलरने (77 चेंडूंत 150 धावा) शतकं ठोकली.
418 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजने 44 धावांवर आपले दोन फलंदाज गमावले. पण गेलचा प्रहार सुरुच होता. त्याने तिसऱ्या विकेटसाठी डॅरेन ब्राव्होसह (61धावा) 176 धावांची भागीदारी रचली, पण ती अपयशी ठरली. 295 धावसंख्येवर बाद होणारा गेल पाचवा फलंदाज होता. अखेरीस संपूर्ण संघ 389 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडने हा सामना 29 धावांनी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
सेंट जॉर्ज एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या डावात एकूण 24 षटकारांचा वर्षाव झाला. सोबतच एकदिवसीय सामन्यातील एका डावा संघाने लगावलेल्या सर्वाधिक षटकारांचा विक्रमही इंग्लंडच्या नावे जमा झाला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने 22 षटकार ठोकले. तर या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने 23 षटकार ठोकले होते.
एकदिवसीय डावात संघाचे सर्वाधिक षटकार
24 षटकार - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज 2019
23 षटकार - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, 2019
22 षटकार - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, 2019
22 षटकार - न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2014
21 षटकार - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2018
20 षटकार - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, 2015