मुंबई : कुलदीप यादवच्या कसोटी क्रिकेटमधील पदार्पणानंतर 'चायनामन' गोलंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरंतर 'चायनामन' बॉलिंग स्टाईल नाही तर एक शिवी आहे, जी नंतर गोलंदाजीची एक शैली म्हणून नावारुपास आली आणि क्रिकेटच्या शब्दावलीत सामील झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच कमी गोलंदाज या शैलीसाठी ओळखले जातात.
84 वर्षांपूर्वीचा किस्सा
ही घटना 25 जुलै 1933 रोजी घडली आहे. मॅन्चेस्टरमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीमध्ये सामना सुरु होता. वेस्ट इंडीजकडून डावखुरे फिरकीपटू एलिस एचॉन्ग गोलंदाजी करत होते. एचॉन्ग हे चीनी वंशांचे होते, हे सगळ्यांनाच माहित होतं. त्यांनी असा एक भन्नाट चेंडू टाकला जो ऑफवरुन लेगकडे वळला. इंग्लंडचे फलंदाज वॉल्टर रॉबिन्स यांना टर्न समजला नाही आणि बाद झाले.
संतापलेल्या रॉबिन्स यांची प्रतिक्रिया
बाद झाल्यानंतर वॉल्टर रॉबिन्स संतापले. पॅव्हिलियनकडे परतताना रॉबिन्स यांनी काही अपशब्द उच्चारले, त्यामध्ये 'चायनामन' असा शब्द होता. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर रिची बेनो यांनी या गोष्टीचा खुलासा केला. यानंतर एचॉन्ग यांच्या अशा गोलंदाजीला 'चायनामन' म्हणून ओळख मिळाली.
82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव
सोप्या शब्दात 'चायनामन' म्हणजे...
कोणत्याही डावखुऱ्या फिरकीपटूने बोटांऐवजी मनगटाने चेंडू वळवला, तर त्याला 'चायनामन' गोलंदाज म्हटलं जातं. चायनामन गोलंदाजाचा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आतल्या बाजूने वळतो, तर डावखुऱ्या फलंदाजांसाठी बाहेरच्या दिशेने वळतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'चायनामन' गोलंदाज
आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच कमी गोलंदाज आहेत, ज्यांना 'चायनामन' अशी ओळख मिळाली आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पॉल अॅडम्स, ऑस्ट्रेलियाचा मायकल बेवन, सायमन कॅटिच, ब्रॅड हॉग, श्रीलंकेच्या के लक्षण रंगिका यांच्यानंतर आता भारताचा कुलदीप यादव सामील झाला आहे.
कुलदीप यादवचा ऑस्ट्रेलियाला दणका
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत दुखापतग्रस्त विराट कोहलीऐवजी भारतीय संघात कुलदीप यादवला संधी देण्यात आली. कुलदीप यादवने या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 'चायनामन' गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाला चांगलाचा दणका दिला.