Ruturaj Gaikwad : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयाला गवसणी घातली आहे. चेन्नईच्या या विजयाचा शिल्पकार राहिला मराठमोळा ऋतुराज गायकवाड. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं या विजयाचं श्रेय नाबाद 88 धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला दिलं. अर्थात ऋतुराजनं संकटात असलेल्या संघाला केवळ सावरलंच नाही तर एक आव्हानात्मक धावसंख्याही उभारुन दिली. याच बळावर चेन्नईनं सामना जिंकला.  


IPL 2021 : चेन्नई विरुद्ध मुंबईच्या लढतीत अंबाती रायडूला दुखापत; धोनी म्हणाला...


खराब सुरुवातीनंतर चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर 156 धावा केल्या. या अर्धशतकी खेळी दरम्यान त्याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. युएईतील आयपीएल सामन्यांमध्ये सलग चार सामन्यात अर्धशतक ठोकणारा ऋतुराज पहिला फलंदाज बनला आहे. ऋतुराजने यापूर्वी 2020 च्या आयपीएलमध्ये अखेरचे तीन सामने खेळताना सलग तीन अर्धशतकं ठोकली होती. त्यावेळी त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरूद्ध 51 चेंडूत नाबाद 65, केकेआरविरुद्ध 53 चेंडूत 72 आणि पंजाबविरुद्ध 44 चेंडूंमध्ये नाबाद 57 धावा केल्या होत्या. 



आयपीएलच्या या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नईची दयनीय अवस्था झाली होती. फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना व कर्णधार धोनी अवघ्या 24 धावा काढून परतल्यानंतर ऋतुराजने मुंबईच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. त्यानं 57 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकार ठोकत नाबाद 88 धावांची खेळी केली. ही खेळी त्याची आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट खेळी देखील ठरली.  


आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईची विजयी सुरुवात 


आयपीएल 2021 च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत ऋतुराजच्या 88 धावांच्या बळावर 20 षटकांत सहा गडी बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ निर्धारित षटकांत केवळ 136 धावा करू शकला. आयपीएल 2021 मध्ये चेन्नईचा हा सहावा विजय आहे. आता त्यांचे आठ सामन्यात 12 गुण आहेत. या विजयासह चेन्नईने आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातील पराभवाचा बदलाही घेतला. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध 218 धावा करूनही सामना जिंकता आला नव्हता मात्र, काल चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.