MS Dhoni on Ambati Rayudu Injury : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयाला गवसणी घातली आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं या विजयाचं श्रेय नाबाद 88 धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि फलंदाजी, गोलंदाजीत धमाकेदार खेळी करणाऱ्या ड्वेन ब्रोवोला दिलं. यानंतर त्यांनं कालच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या अंबाती रायडूबाबतही माहिती दिली. 


चेन्नईच्या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, "अंबाती रायडू हसत होता. याचाच अर्थ त्याच्या हाताला झालेली दुखापत तेवढी गंभीर नाही. त्याच्याकडे आणखी चार दिवस आहेत. या चार दिवसांची त्याला खरोखरच मदत होईल."


अंबाती रायडूला कालच्या सामन्यात दुखापत 


चेन्नई सुपर किंग्सचा संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरल्यानंतर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज एडम मिल्नेच्या बाउंसरवर अंबाती रायडूला दुखापत झाली. त्यानंतर त्याला माघारी परतावं लागलं. जेव्हा रायडू क्रिजवर होता, त्यावेळी चेन्नईनं आधीच दोन गडी गमावले होते. रायडूला आपल्या डावाच्या तिसऱ्याच चेंडूत मिल्नेचा बाउंसर हाताच्या कोपरावर लागला. त्यानंतर रायडूला पाहण्यासाठी संघातील काही डॉक्टर्स आले. त्यांनी त्याला मैदानातून माघारी जाण्याचा सल्ला दिला. रायडू सामन्याच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये रिटायर हर्ट होऊन माघारी परतला. 


आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईची विजयी सुरुवात 


आयपीएल 2021 च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत सहा गडी बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ निर्धारित षटकांत केवळ 136 धावा करू शकला. आयपीएल 2021 मध्ये चेन्नईचा हा सहावा विजय आहे. आता त्यांचे आठ सामन्यात 12 गुण आहेत.


या विजयासह चेन्नईने आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातील पराभवाचा बदलाही घेतला. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध 218 धावा करूनही सामना जिंकता आला नाही. त्या सामन्यात मुंबईने हारला विजयात बदललं होतं. मात्र, आज चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.