Carlos Alcaraz beats Taylor Fritz : विम्बल्डन ओपन 2025 च्या उपांत्य फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराजने जबरदस्त खेळत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा 6-4, 5-7, 6-3, 7-6 (8-6) असा पराभव केला. या विजयासह अल्काराजने सलग तिसऱ्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी 2023 आणि 2024 मध्येही त्यांनी अंतिम फेरी गाठून विजेतेपद जिंकले होते.
पहिल्याच सेटपासून अल्काराजची आक्रमक सुरुवात
अल्काराजने पहिल्या सेटमध्येच आपली क्लास दाखवली. फ्रिट्झला फारशी संधी न देता त्याने हा सेट 6-4 असा सहज जिंकला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये टेलर फ्रिट्झने जोरदार पुनरागमन करत 7-5 असा सेट जिंकला आणि सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.
तिसऱ्या सेटपासून अल्काराजची सामन्यावर पूर्ण पकड...
तिसऱ्या सेटमध्ये अल्काराजने अधिक आक्रमकता दाखवत फ्रिट्झला अजिबात संधी दिली नाही. त्याने हा सेट 6-3 असा सहज जिंकला. चौथा सेट अत्यंत रोमांचक ठरला आणि टायब्रेकपर्यंत गेला. येथेही अल्काराजने निर्धाराने खेळ करत 7-6 (8-6) असा सेट जिंकत सामना आपल्या बाजूने झुकवला. या विजयामुळे अल्काराज पुन्हा एकदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. सलग तिसऱ्या विजेतेपदासाठी अल्काराज सज्ज आहे.
कार्लोस अल्काराजची सहाव्या किताबाकडे वाटचाल!
कार्लोस अल्काराजने आतापर्यंत टेनिस जगतात पाच ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत. त्यामध्ये दोन फ्रेंच ओपन (2024, 2025), दोन विंबलडन ओपन (2023, 2024) आणि एक यूएस ओपन (2025) यांचा समावेश आहे. आता त्याच्याकडे सहावा ग्रँडस्लॅम जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. विम्बल्डन 2025 च्या अंतिम फेरीत त्याचा सामना नोवाक जोकोविच आणि यानिक सिनर यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे. आता संपूर्ण जगाचं लक्ष या थरारक अंतिम लढतीकडे लागले आहे.