मुंबई : पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे महिला खेळाडूंसाठीही आयपीएलच्या धर्तीवर एखादी टी 20 लीग असावी, अशी इच्छा महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केली आहे. यावर्षी मितालीच्या नेतृत्वात टीम इंडियाने महिला वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.


गेल्या काही वर्षात आयपीएलमुळे पुरुषांच्या क्रिकेटला जो लाभ मिळाला आहे, तो महिला क्रिकेटलाही मिळावा आणि देशात मोठ्या प्रमाणावर महिला क्रिकेटपटू तयार व्हाव्यात, यासाठी महिला टी20 लीग सुरु व्हावी, अशी इच्छा मितालीने व्यक्त केली. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत मिताली राजने आपला मानस बोलून दाखवला.

'आयपीएलप्रमाणे महिलांसाठी टी 20 लीग सुरु झाली, तर मोठ्या प्रमाणावर महिला क्रिकेटपटू तयार होतील. महिला क्रिकेटचं भवितव्य उज्ज्वल आहे. आम्ही दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारे सामने प्रेक्षक काळजीपूर्वक पाहतील आणि आमच्या कामगिरीचं निरीक्षण करतील, याची मला खात्री आहे. कारण त्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.' असं मिताली म्हणते.

मिताली राजला तेलंगणा सरकारतर्फे एक कोटी रुपये आणि 600 चौरस फूटांचं घर प्रदान करण्यात आलं. मायदेशी आगमन झाल्यानंतर विमानतळावर झालेल्या स्वागतामुळे आपण भारावल्याचं मितालीने सांगितलं.

44 वर्षांच्या महिला विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाने दुसऱ्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2005 मध्येही मितालीच्या नेतृत्वात महिला क्रिकेट संघाने फायनलमध्ये धडक मारली होती.